esakal | Video : पारंपरिक चित्रशैलींना आधुनिकतेची जोड
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रकार सुषमा भालेराव

चित्रकलेतील दाक्षिणात्य तंजौर शैली, राजस्थानची शेखावती किंवा तुर्कस्तानची स्वतंत्र शैली अशा निरनिराळ्या ऐतिहासिक परंपरांचा अभ्यास चित्रकार सुषमा भालेराव यांनी केला आहे. यात प्रचलित कला माध्यम वापरून त्या फ्युजन करतात. तंजौर परंपरेत आधी मक बोर्ड बनवण्याची कष्टसाध्य प्रक्रिया पार पाडत अनेक टप्प्यानंतर चित्र कलाकृती पूर्णत्वाला जाते. बावीस कॅरेट सोने व रंगीत खड्यांचा केलेला वापर यांतील परंपरा सांभाळत त्यात वेगळेपण आणतात.

Video : पारंपरिक चित्रशैलींना आधुनिकतेची जोड

sakal_logo
By
नीला शर्मा

चित्रकलेतील दाक्षिणात्य तंजौर शैली, राजस्थानची शेखावती किंवा तुर्कस्तानची स्वतंत्र शैली अशा निरनिराळ्या ऐतिहासिक परंपरांचा अभ्यास चित्रकार सुषमा भालेराव यांनी केला आहे. यात प्रचलित कला माध्यम वापरून त्या फ्युजन करतात. तंजौर परंपरेत आधी मक बोर्ड बनवण्याची कष्टसाध्य प्रक्रिया पार पाडत अनेक टप्प्यानंतर चित्र कलाकृती पूर्णत्वाला जाते. बावीस कॅरेट सोने व रंगीत खड्यांचा केलेला वापर यांतील परंपरा सांभाळत त्यात वेगळेपण आणतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुषमा भालेराव यांनी तंजौर शैलीतील तयार केलेल्या एकेका चित्राच्या निर्मितीची गोष्ट ऐकण्यासारखी असते. प्लाइवुडवर मांजरपाट हे विशिष्ट प्रकारचं कापड ताणून बसवून चिकटविण्याची पद्धत, त्यावर तांदळाचं पीठ व गोंदाचे थरावर थर, नंतर तो पट घासून मुलायम करणं, त्यावर चित्रकाम सुरू करणं, रंगांचा उपयोग, बावीस कॅरेट सोनं व रंगीत खडे त्यावर खुबीने बसवणं आदी कित्येक पायऱ्या सुषमाताई खुलासेवार सांगतात.

त्या म्हणाल्या, ‘‘मला इतिहासाची आवड असल्याने चित्रकला संदर्भात ही काही प्रांतातील चित्र परंपरा जाणून घ्यायला मी उत्सुक होते. संधी मिळेल त्या प्रांतातील चित्रशैली समजून घेत राहिले. तमिळनाडूतील तंजौर, राजस्थानमधील शेखावती याचबरोबर तुर्की पद्धतीची शैलीही आत्मसात केली. त्यात कधी रंगांच्या वापराबाबत तर कधी हॉट सिरॅमिकसारख्या माध्यमाची जोड देणं, असे प्रयोग करत मी  फ्युजनचे प्रयोगही केले आहेत.’’

सुषमाताईंनी असंही सांगितलं की, पूर्वी व्यापाराच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रांतांमध्ये तसंच काही देशांमध्ये आपापसांत देवाणघेवाण चालायची. त्या अंतर्गत कलात्मक वस्तूंचीही देवघेव असायची. कलाकृती भेटीदाखल दिल्या जात. यातून विविध शैली स्थानिक सीमा ओलांडून प्रवास करत राहिल्या. 
भौगोलिक प्रवासाप्रमाणेच काळाचा प्रवासही झाला. काळाच्या ओघात नवनवे कलावंत एकेका शैलीत आपलं काही करून पाहत राहिले. 

रसिकांना रुचलं तर अशा प्रयोगांना मागणी येत गेली. केवळ कलावंत, अभ्यासक-संशोधक यांनीच नव्हे तर सर्वसामान्यांनीसुद्धा विविध प्रदर्शनं किंवा वस्तुसंग्रहालयांमध्ये जाऊन निरनिराळ्या पारंपरिक चित्रशैलींची माहिती करून घ्यावी. अभिजात कलांचा आस्वाद घेण्याची क्षमता वाढवावी. त्यामुळे जीवनात सौंदर्यमूल्यांची जपणूक करण्यासाठीची दृष्टी तयार होते.