कॅमेऱ्यातील 'कैद' आरोपी मोकाटच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

तपास गतीने सुरू आहे. लवकरच या घटनेचा छडा लावण्यात यश येईल.
- सर्जेराव पाटील, पोलिस निरीक्षक, लोणीकंद

वाघोली : येथील बगाडे ज्वेलर्स सराफी पेढीतील चोरी प्रकरणातील आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. चोरट्यांच्या गोळीबारात जखमी झालेला कर्मचारी सिद्धेश भुजबळ याची प्रकृती स्थिर आहे. पाच महिन्यांत येथे चोरीच्या उद्देशाने गोळाबाराची ही दुसरी घटना घडली. पहिल्या घटनेचा छडा लावण्यातही पोलिसांना यश आलेले नाही.

वाघोलीतील बगाडे ज्वेलर्समध्ये चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून 17 तोळे सोन्याचे दागिने लुटले. त्यांचा पाठलाग करणारा कर्मचारी भुजबळ याच्यावर त्यांनी गोळीबार केला. गोळी लागून तो जखमी झाला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यात चोरट्यांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. मात्र घटनेला सहा दिवस उलटूनही पोलिस तपासात यश नाही.
पाच महिन्यांपूर्वी वाघोलीतील टीसीआय कंपनीच्या गोदामात चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी शिवाजी काजळे या सुरक्षारक्षकाचा गोळी घालून खून केला. ही घटनाही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. मात्र त्या घटनेचाही छडा लावण्यात पोलिसाना यश आले नाही. याशिवाय चोरीच्या उद्देशाने चाकूने भोसकून एका विद्यार्थ्याचा खून केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. मात्र तो गुन्हाही उघडकीस आला नाही. यामुळे पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

गोळी अद्याप शरीरातच
चोरट्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या सिद्धेश भुजबळ याच्या शरीरातील गोळी अद्याप काढण्यात आलेली नाही. त्या ठिकाणी सूज असल्याने गोळी काढणे शक्‍य नाही. सूज कमी झाल्यानंतर शस्त्रक्रिया करून गोळी काढण्यात येईल, असे डॉक्‍टरानी सांगितल्याचे बगाडे ज्वेलर्सचे व्यवस्थापक शिवाजी आसवले यांनी सांगितले.

आम्ही करायचे काय?
गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी पोलिस व्यापाऱ्यांना सीसीटीव्ही कॅमेरे व अन्य सुरक्षा यंत्रणा बसविण्याचे आवाहन करतात. अनेक व्यापारी खर्च करून कॅमेरे बसवितात. मात्र त्या कॅमेऱ्यात चोरीच्या घटना कैद होऊनही त्याचा छडा लागत नसले, तर आम्ही करायचे काय, असा सवाल व्यापारी करीत आहेत.
 

Web Title: suspects caught on camera roaming free