Pune Zilla Parishad : दत्तात्रेय वारे यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करा; निर्मला पानसरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Zilla parishad
Pune Zilla Parishad : दत्तात्रेय वारे यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करा; निर्मला पानसरे

दत्तात्रेय वारे यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करा

पुणे : शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथील अटलबिहारी वाजपेयी इंटरनॅशनल स्कूलचे माजी प्रभारी मुख्याध्यापक आणि विद्यमान सहशिक्षक दत्तात्रेय वारे यांना त्यांच्यावरील आरोपाची चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करा, असा निर्णय सोमवारी (ता. २२) झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी याबाबतची घोषणा सभागृहात केली.

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेजस प्रकल्पांतर्गत या शाळेची निवड केली होती. या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांकडून देणगी घेण्यासाठी कास बाब म्हणून या शाळेला परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर याच शाळेच्या धर्तीवर राज्यातील १०० शाळांची ओजस प्रकल्पांतर्गत निवड करून त्या शाळांमधील गुणवत्ता वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. हा निर्णय घेतल्यानंतर वाबळेवाडी शाळेला इंटरनॅशनल स्कूलचा दर्जा देण्यात आला होता. आता राज्य सरकारनेही हा दर्जा काढून घेतला आहे.

दत्तात्रेय वारे हे या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या आदेशानुसार नियमानुसारच शाळेला देणग्या घेतल्या होत्या, असे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. परंतु त्यांनी या स्वतःच्या नावावर सुमारे साडेआठ कोटी रुपये किमतीची जमीन खरेदी केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानंतर स्थानिक विद्यार्थ्यांना या शाळेत प्रवेश मिळत नसल्याची तक्रार एका पालकाने जिल्हा परिषदेकडे केली होती. या तक्रारीनंतर त्यांची चौकशी सुरू केली आहे. चौकशी सुरु होताच, त्यांना प्रभारी मुख्याध्यापक पदावरून दूर केले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी सभागृहाला सांगितले.

मात्र, हे शिक्षक शाळेत कार्यरत राहिल्यास. चौकशीला अडथळे येऊ शकतात. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करावे, अशी जोरदार मागणी मागणी तालुक्यातील सर्व महिला जिल्हा परिषद सदस्यांनी केली. या मागणीसाठी सदस्या सुजाता पवार, सुनीता गावडे, सविता बगाटे आणि शिरूर पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे आक्रमक झाल्या. या मागणीसाठी या महिला सदस्यांनी सभागृहात प्रचंड गदारोळ केला. दरम्यान, याबाबतचा निलंबन आदेश अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आदेश प्राप्त झाल्यानंतर प्रतिक्रिया देऊ, असे शिक्षक दत्तात्रेय वारे यांनी सांगितले.

loading image
go to top