कुटुंबाला धमकविणारे चालक - वाहक निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

पुणे - मध्यरात्रीच्या प्रवासात कुटुंबाला धमकाविल्याबद्दल पीएमपीच्या बसचे चालक आणि वाहकाला प्रशासनाने बुधवारी निलंबित केले, तर त्या कुटुंबाची टोलवाटोलवी करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी दिले आहेत. 

पुणे - मध्यरात्रीच्या प्रवासात कुटुंबाला धमकाविल्याबद्दल पीएमपीच्या बसचे चालक आणि वाहकाला प्रशासनाने बुधवारी निलंबित केले, तर त्या कुटुंबाची टोलवाटोलवी करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी दिले आहेत. 

 कात्रज आगाराकडील बस क्रमांक ९८४ वरील चालक चंद्रकांत भिकोबा पवार आणि वाहक सौरभ बबन पवार यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या खातेनिहाय चौकशीचा आदेशही पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी दिला आहे. हनुमंत पवार हे पत्नी, सात वर्षांची मुलगी आणि पुतणीसह मंगळवारी रात्री स्वारगेटवरून कात्रजकडे जाण्यासाठी निघाले होते. बसमध्ये कडेवर मुलगी असल्यामुळे पवार यांनी आरक्षित जागेवर पत्नीला बसू द्यावे, अशी विनंती महिलांच्या आरक्षित जागेवर बसलेल्या प्रवाशांना केली; परंतु त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे त्यांनी वाहक सौरभ पवार यांना जागा मिळवून देण्याची विनंती केली. तेव्हा वादविवाद झाला. त्यात वाहकाने पवार यांना शिविगाळ करून धमकाविले आणि बसमधून बळजबरीने उतरवले. याबाबतच्या घटनेचे वृत्तांकन ‘सकाळ’च्या बुधवारच्या अंकात प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेऊन पीएमपी प्रशासनाने चौकशी केली. त्यात प्राथमिक चौकशीत महिलांसाठीची आरक्षित जागा उपलब्ध करून देण्याकडे वाहक पवार यांनी दुर्लक्ष केले. तसेच त्यांनी चालकाच्या मदतीने हनुमंत पवार यांना बळजबरीने बसमधून उतरविल्याचे आढळले. दरम्यान, हनुमंत पवार यांच्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चौकशी करण्याचे आदेश आयुक्त शुक्‍ला यांनी सहायक आयुक्त शिवाजी पवार यांना दिले आहेत.

पोलिसांनी तक्रारीस भाग पाडले
हनुमंत पवार हे वाहकाविरुद्ध तक्रार देण्यासाठी सहकारनगर पोलिस चौकीत गेले तेव्हा तेथील उपनिरीक्षकाने त्यांना शिवीगाळ केली. तेव्हा पवार यांनी त्याच्याविरुद्धही तक्रार नोंदवायची आहे, असे सांगितले. तेव्हा त्या उपनिरीक्षकाने चालक-वाहकाला बोलवून हनुमंत पवार यांच्याविरुद्ध तक्रार देण्यास भाग पाडले, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले. सहकारनगर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. 

Web Title: Suspending driver threatening the family