स्वप्नीलला पुढे शिकता येणार?

Education
Education

टाकवे बुद्रुक - दीड वर्षांचा असतानाच त्याचे वडिलांचे छत्र हरपले, हे दु:ख कमी म्हणून की काय जन्मदात्री आई सोडून गेली. पोरक्‍या झालेल्या या नातवाला आजीने उराशी कवटाळले, तर वृद्ध आजोबांनी हॉटेलात कप-बशी धुवून त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी पेलली. तो आता आठवीत शिकत असून, स्वप्नील मालपोटे त्याचे नाव. भोयरेतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तो शिक्षण घेतानाच जगण्याचे धडेही गिरवत आहे. मात्र, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याचे शिक्षण मध्यावरच थांबते की काय, असा प्रश्‍न पडला आहे. 

स्वप्नील फळणे गावचा. तो दीड वर्षांचा असताना वडिलांचा मृत्यू झाला. त्याची आई त्याला घेऊन माहेरी कशाळला आली. तिने त्याला आईकडे सोपवून काढता पाय घेतला ती आजपर्यंत आलीच नाही. त्याची संपूर्ण जबाबदारी आजी चंद्रभागा जाधव यांनी घेतली. त्यांनी तिने लेकीच्या लेकाला मायेची ऊब दिली. आजोबा बबन जाधव यांनी घरदार सोडून नोकरीसाठी मुंबई शहर गाठले. हॉटेलात कपबशी धुवून ते दोघांच्या उदरनिर्वाहासाठी राबत राहिले. त्यांची याची जखम भरून निघते ना निघते तोच त्यांचा मोठा मुलगा आजारपणात दगावला अन्‌ आभाळ कोसळले. 

आजी-आजोबा सत्तरीकडे झुकले आहेत. आठवीत शिकणाऱ्या स्वप्नीलचे शिक्षण अर्ध्यावर सुटते का, असा प्रश्न पडला आहे. त्याच्या पुढील शिक्षणासाठी सामाजिक संस्था, दानशूरांच्या मदतीच्या हाताची अपेक्षा आहे. तोच आधार त्याच्या जगण्याची उमेद वाढेल.

खर्च वाढला
शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष अनिल जाधव म्हणाले, ‘‘स्वप्नील हुशार आहे. आतापर्यंत प्राथमिक शाळेत पुस्तके-वह्या मोफत मिळाल्या. आता तो कशाळवरून भोयरेला शाळेत जातो. त्यामुळे खर्च वाढला आहे.’’

हुशार विद्यार्थी
मुख्याध्यापक दत्तात्रेय भोसले व वर्गशिक्षक होनाजी गवारी म्हणाले, ‘‘स्वप्नील शाळेतील गुणवंत व हुशार विद्यार्थी आहे. वर्गात त्याचा आलेख चढता आहे. खेळ, वाचनाची त्याला आवड आहे. परीक्षा, वह्या, पुस्तके, गणवेश यासाठी त्याला अंदाजे पंधरा-वीस हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.’’

मोठ्या मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबाचा आधार गेला. लहान मुलगा मुंबईला असतो. आम्हीही आता थकलो आहेत. स्वप्नीलसाठी त्याचे आजोबा या वयातही हॉटेलात नोकरी करतात. त्याच्या शिक्षणासाठी मदतीचा हात मिळावा.
- चंद्रभागा जाधव, स्वप्नीलची आजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com