स्वराज्य संस्कार शिल्पाला मंजुरी

Pune-Municipal
Pune-Municipal

पुणे - सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर स्मारकामध्ये ‘स्वराज्य संस्कार शिल्प’ साकारण्यास स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 

हे संस्कार शिल्प प्रसंग चित्ररूपात खात्याकडे सादर केले जाणार आहेत. त्यानंतर मातीचा साचा तयार करून वेळोवेळी केलेल्या सूचनांनुसार आवश्‍यक ते बदल करण्यात येणार आहेत. त्यानंतर ब्राँझ धातूचा वापर करून समूह शिल्प तयार करून जागेवर बसविण्यात येणार आहे, असे समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले.

या शिल्पातील मुख्य पुतळ्याचे वजन साडेनऊशे ते एक हजार किलो व समूह शिल्पात समावेश असलेल्या पुतळ्यांचे वजन ५५० ते ६००  किलो असणार आहे. शिल्पाचे एकूण वजन चार हजार किलोपर्यंत असणार आहे. या शिल्पामध्ये वीर बाजी पासलकर यांचा आठ फूट उंचीचा पुतळा असून, बाल शिवाजी व त्यांच्या सवंगड्यांचे पुतळे असणार आहेत. शिल्पनिर्मितीमुळे छत्रपती शिवाजी महाराज व वीर बाजी पासलकर यांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेले कार्य यांच्याबद्दलची ऐतिहासिक माहिती उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ४६ लाख ९१ हजार रुपये खर्च येणार असून, पुढील चार वर्षांत काम पूर्ण केले जाणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले.

मुंढवा येथे रेल्वे पूल बांधण्यास मंजुरी
मुंढवा येथील पुणे-सोलापूर रेल्वे कॉसिंगवर एचसीएमटीआर रस्त्यासाठी रेल्वे पूल बांधण्यासाठी सुमारे अकरा  कोटी रुपयांच्या वर्गीकरणाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली, असे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले.

कात्रज प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेश शुल्कात वाढ
कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात प्रौढ व्यक्तींसाठीच्या प्रवेश शुल्क वाढविण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. प्राणिसंग्रहालय सल्लागार समितीने सुचविल्यानुसार ही दरवाढ करण्यात आली असल्याचे समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले. प्रौढ व्यक्तींसाठी सध्या २५ रुपये शुल्क आकारण्यात येते. ते ४० रुपये करण्यात आले आहे. बॅटरी ऑपरेटेड वाहनातून प्रौढांना प्रवास करण्यासाठी चाळीस रुपयांऐवजी पन्नास रुपये आकारण्यात येणार आहेत. लहान मुलांचे शुल्क दहा रुपये, शैक्षणिक सहलीसाठी खासगी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शुल्क दहा रुपये, मनपा, जिल्हा परिषद, शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शुल्क पाच रुपये, विदेशी नागरिकांसाठी शुल्क १०० रुपये आणि लहान मुलांसाठी बॅटरी ऑपरेटेड वाहनाचे शुल्क २५ रुपये कायम ठेवण्यात आले. तीन वर्षांखालील मुले, अंध, अपंग यांना प्रवेश विनामूल्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com