स्वारगेट उड्डाण पुलावर "उलटा-पुलटा'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

पुणेकरांना अंधारात ठेवून वाहतूक पोलिसांचा "प्रयोग'; हजारो पुणेकरांचे हाल

पुणे : कात्रज-पद्मावतीकडून येणाऱ्या वाहनांना सारसबागेकडे जाण्यासाठी केशवराव जेधे उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. शंकरशेठ रस्त्यावर उतरणाऱ्या या पुलाचे दुसरे टोक वाहतुकीसाठी खुले ठेवले असून, उलट्या दिशेने सारसबागेकडे जाण्यासाठी या पुलाचा वापर आता करणार आहे. वर्दळीच्या चौकामध्येच वाहतुकीचा हा "प्रयोग' राबविण्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी पुणेकरांना आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही अंधारात ठेवले आहे.

नागरिकांना या प्रयोगाबद्दल कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. प्रचलित पद्धतीनुसार प्रसिद्धिमाध्यमांतून याबाबत निवेदन प्रसिद्ध करणे किंवा महापालिकेला पत्र देऊन कळविण्याची प्रक्रियाही पूर्ण केली गेली नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत तोंडी माहिती दिली होती. मंगळवारी दुपारी अचानक पुलाच्या परिसरात वाहतूक बदलाची माहिती देणारे फलक आणि ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक केल्याचे दिसून आले. शंकरशेठ रस्त्यावरून सारसबागेकडे जाण्यासाठी पुलावर चढून पुलावर असलेल्या "वाय' आकाराच्या ठिकाणी विचित्र पद्धतीने वाहने वळवून जावे लागत असल्यामुळे जीव धोक्‍यात येऊ शकतो, अशी भीती वाहनचालकांनी व्यक्त केली. आता सातारा रस्त्यावरून उड्डाण पुलावर जाण्यास बंदी घातल्यामुळे तेथून जेधे चौकापर्यंतचा पुलावरील भागही निरुपयोगी ठरत आहे.

वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे म्हणाले, ""उड्डाण पुलाचा वापर कमी प्रमाणात होत असल्याचे आमचे निरीक्षण होते. त्यातच शंकरशेठ रस्त्याकडून सारसबागेकडे जाण्यासाठी सुरू असलेल्या कामामुळे जेधे चौकात वाहतूक कोंडी होत होती. ती सोडविण्यासाठी पुलाच्या वापराच्या पद्धतीत बदल केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून हा बदल आम्ही करून पाहिला आहे आणि त्यात आम्हाला यश आले आहे. जेधे चौकातील वाहतूक कोंडी 30 ते 40 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे आमचे निरीक्षण आहे. त्यामुळे हा प्रयोग आणखी काही दिवस आम्ही सुरू ठेवणार आहोत.''

उड्डाण पुलाखाली "कोंडी' कायम
लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळ आणि त्यापुढील जेधे चौकात; तसेच मित्रमंडळ चौकामध्ये वाहतूक कोंडी होत आहे. जेधे चौकामध्ये प्रवाशांसह पीएमपी बसगाड्या आणि रिक्षा रस्त्याच्या मधोमधच उभ्या राहात असल्यामुळे सकाळी नऊ ते अकरा या वेळेत कोंडी होते. वाहतूक पोलिसांची नेमणूक असली तरी बेशिस्त रिक्षाचालकांवर कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटत नाही. सारसबागेकडे वळण्यासाठी सर्व वाहनांना चौकामध्ये फक्‍त एकच लेनएवढी जागा शिल्लक राहत आहे. सकाळच्या वेळी तर पीएमपीच्या बस एकामागे एक येत असल्यामुळे दुचाकीचालक स्वतःचा जीव धोक्‍यात घालून या बस ओलांडून जात असल्याचे दिसते.

असा झाला बदल...
- सातारा रस्त्यावरून पुलावर जाण्यास मनाई
- शंकरशेठ रस्त्यावरून पुलावर विरुद्ध दिशेने सारसबागेकडे जाण्यास परवानगी
- सारसबागेकडे जाण्यासाठी पंचमी हॉटेल, लक्ष्मीनारायण चित्रपटगृह किंवा जेधे चौकातून डावीकडे वळण्याचे आवाहन
 
Web Title: Swargate to bridge the reverse