‘स्वस्थ कन्या’चा मंत्र ३२ हजार युवतींपर्यंत पोचला!

ज्ञानेश्वर रायते
बुधवार, 12 डिसेंबर 2018

बारामती - सातवी ते दहावीपर्यंतच्या शाळकरी मुली मासिक पाळी आणि शारीरिक स्वच्छतेबद्दल सार्वजनिक बोलणे म्हणजे जणू मोठी चूक समजत होत्या... त्या मुली बोलत्या झाल्या... बॅड टच, गुड टच बाबत जागृतही झाल्या आणि सॅनिटरी नॅपकीनबाबत दक्षही झाल्या.. हे सारे अगदी सहज घडले नाही, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी गेल्या काही महिन्यांपासून सुरू केलेल्या स्वस्थ कन्या, स्वस्थ भारत योजनेंतर्गत ३२ हजार मुली, महिलांपर्यंत ‘स्वस्थ कन्या’चा मंत्र पोचविला..

सुनंदा पवार यांनी चला समृद्ध गाव घडवू या अभियानानंतर शालेय युवतींच्या जनजागृतीसाठी हा विधायक उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत बारामती, पुरंदर, इंदापूर तालुक्‍यांसह १५० शाळांमध्ये त्यांनी स्वतः भेट देऊन मुलींशी संवाद साधला. नुकताच त्यांनी भवानीनगर येथे एक हजार मुलींशी संवाद साधत ३२ हजार युवतींपर्यंत ‘‘स्वस्थ कन्या’’चा मंत्र पोचविण्याची संख्या पूर्ण केली आहे. मुलींशी संवाद साधण्यापूर्वी ट्रस्टच्या वतीने १५ मिनिटांचा एक लघुपट दाखविला जातो. त्या माध्यमातून मुलींना थोडीफार कल्पना येते. 

मात्र, तेवढ्यापुरते न थांबता सॅनिटरी नॅपकिन किंवा कॉटनचे कापड याविषयी त्या स्पष्ट व सडेतोड बोलतात. शारीरिक स्पर्शापासून ते नात्यातील चुकीच्या वृत्तीपासून, अगदी शाळेतल्या वर्तनापर्यंत नेमके काय जपायला हवे याचा थेट सल्ला त्या देतात. जे आईने बोलायला हवे, ते अगदी सर्वांसमक्ष सांगताना सुनंदा पवार या मासिक पाळी या विषयाला लपविण्यापेक्षा त्याचे स्वागत करायला हवे इथपर्यंत त्यांची मानसिकता तयार करतात आणि एवढे करून थांबत नाहीत, तर ट्रस्टमध्ये जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या सोबती प्रकल्पात तयार झालेली सॅनिटरी नॅपकिन मोफत वितरित करतात. आतापर्यंत अशा नॅपकीनची ३२ हजार पाकिटे त्यांनी युवती, महिलांपर्यंत मोफत पोचवली आहेत.

ग्रामीण भागात आजही मासिक पाळी हा सार्वजनिक बोलण्याचा विषय नाही असे समजले जाते. मात्र, आता हळूहळू जनजागृती होतेय, सोबती हा रोहित पवार यांनी पर्यावरणपूरक केलेला सॅनिटरी नॅपकीनचा प्रकल्प आहे. यातून मुलगी स्वतःची काळजी घेईल, संसर्गजन्य आजारापासून स्वतःच्या शरीराची काळजी घेण्याची दक्षता घेईल.
- सुनंदा पवार, विश्वस्त, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती 

Web Title: Swasth Kanya Swasth Bharat Yojana Sunanda Pawar