‘स्वयंम’ नंतर ‘सीसॅट-२’

Swayam-Satellite
Swayam-Satellite

पुणे - ‘स्वयंम’ या कृत्रिम उपग्रहाच्या अभिनव यशानंतर पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सीसॅट-२ या उपग्रहाची निर्मिती करत आहेत. वातावरणातील प्रभारीत कणांचा अभ्यास आणि उपग्रहाची भ्रमणकक्षा बदलण्यासाठी सौर पंखांचा वापर या संशोधनाचा वापर सीसॅट-२ मध्ये केला जाणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या उपग्रह उपक्रमाच्या मार्गदर्शक डॉ. मनीषा खळदकर यांनी सांगितले. 

डॉ. खळदकर म्हणाल्या, की स्वयंमच्या निमित्ताने आमच्याकडे जमिनीवरील संदेशकेंद्र, आवश्‍यक संसाधने, विशेष स्वच्छता कक्ष उपलब्ध आहेत. तसेच महाराष्ट्र सरकार आणि इस्रोकडून उपग्रहासाठी आर्थिक मदत दिली होती आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांमधील निर्मिती क्षमतेत सातत्य ठेवण्यासाठी आम्ही सीसॅट-२ चे काम सुरू केले.’’

स्वयंमपेक्षा तांत्रिकदृष्ट्या क्‍लिष्ट असलेल्या या उपग्रहाची निर्मिती सुमारे चाळीस विद्यार्थी करत आहेत. विद्यार्थ्याच्या चमूचे सात विभागांमध्ये वर्गीकरण केले आहे. यामध्ये प्रशासकीय जबाबदारी पार पाडणारा आदित्य नेरलकर म्हणतो, की एखाद्या मोठ्या प्रकल्पावर काम करताना समूहासोबत काम करण्याचा अनुभव विलक्षण आहे. या प्रकल्पामुळे माझ्या आवडीच्या गणित विषयात सांकेतिक लेखन करून त्याचा प्रत्यक्ष वापर करायला मिळत आहे. संप्रेषण विभागाचे काम बघणारा ओंकार चौधरी म्हणतो, की उपग्रह आणि जमिनीवरील केंद्र यांच्यात एकाच वेळेला संदेश देणे आणि घेणे ही प्रणाली प्रथमच यात वापरली जाणार आहे. त्यातील एक भाग मी विकसित करत आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष अनुभवाच्या जगात आम्हाला काम करता येते आहे.

सीसॅट-२च्या नमुना उपग्रहाची निर्मिती विद्यार्थी सध्या करत आहेत. त्यासाठी आयआयटीचे प्राध्यापक आणि इस्रोचे निवृत्त शास्त्रज्ञ मार्गदर्शन करत आहेत. नमुना उपग्रह ते प्रत्यक्ष प्रक्षेपणासाठी तीन वर्षे लागू शकतील, असे डॉ. खळदकर यांनी सांगितले. या महत्त्वाच्या मोहिमेसाठी राज्य सरकारकडून पन्नास लाख रुपये आणि इस्रोकडून वीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

ही आहेत वैशिष्ट्ये
 उपग्रहाचा आकार ४०.५ मीटर वर्ग
 पृथ्वीपासून ७०० किलोमीटर पुढे उपग्रह स्थिरावणार 
 उपग्रहाची भ्रमणकक्षा वाढविण्यासाठी प्रथमच सौर विद्युत घटाचा वापर
 टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या मदतीने वातावरणातील उत्सर्जित किरणांच्या अभ्यासासाठी उपकरणाची निर्मिती.
 वातावरणातील कक्षांमधील इलेक्‍ट्रॉनच्या घनतेचा अभ्यास केला जाणार आहे. यामुळे हवामानाचा अंदाज वर्तवायला मदत 
 उपग्रहाकडून प्राप्त माहितीचे विश्‍लेषण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नॅडिझम करणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com