शेवटच्या क्षणीही टेकऑफ पाहायला आवडेल - मंदार भारदे

शारदानगर (ता. बारामती) - स्वयंसिद्धा संमेलनात बुधवारी पहिल्याच दिवशी राज्यभरातून आलेल्या युवती.
शारदानगर (ता. बारामती) - स्वयंसिद्धा संमेलनात बुधवारी पहिल्याच दिवशी राज्यभरातून आलेल्या युवती.

बारामती - शिक्षण बीकॉम; परंतु मनात जे होते, तेच करण्याचा ध्यास घेतला आणि वारीच्या सोहळ्याचा लघुपट बनवताना हेलिकॉप्टरचा व्यवसाय सुचला. करिअर हेच की, जे तुम्हाला मनापासून आवडते, तेच तुम्ही करा. आयुष्याच्या शेवटच्या क्षणीदेखील मला टेकऑफ पाहायला आवडेल. हेलिकॉप्टर उडतानाची धूळ पाहायला आवडेल...मंदार भारदे राज्यभरातून आलेल्या युवतींना करिअरचा हा नवा मंत्र सांगताना शारदानगरच्या सभागृहात शांतता होती.

ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात आयोजित आठव्या राज्यस्तरीय स्वयंसिद्धा संमेलनात मॅब एव्हिएशनचे संचालक मंदार भारदे त्यांची जीवन कहाणी सांगत होते.

यावेळी ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार, सामाजिक कार्यकर्त्या सविता व्होरा, महाविद्यालयाचे प्राचार्य राजकुमार देशमुख, संस्थेचे समन्वयक प्रशांत तनपुरे उपस्थित होते.

भारदे म्हणाले, ‘‘माझे शिक्षण बीकॉम व त्यानंतर एम.ए. माझ्या शिक्षकांना मी आठवत नाही. मला किती मार्क पडले हे मलाच आता आठवायचे नाही. करिअर निवडताना घरच्यांनी तुला आनंद मिळेल ते कर असा सल्ला दिला.

पहिल्या टप्प्यात डॉक्‍युमेंट्री बनवू लागलो. मी पंढरीच्या वारीवर लघुपट बनवत होतो. वारीचे संचित भारताबाहेर नेण्याचा माझा प्रयत्न होता. एम. एस. गोसावी यांनी बजेट दिले, मला हेलिकॉप्टरमधून दरीतून डोंगरावर चढताना सोहळा टिपण्याची इच्छा होती. मला मात्र ती परवानगी शेवटपर्यंत मिळाली नाही. जर का हेलिकॉप्टरची परवानगी मिळण्यासाठी अडचणी येत असतील तर व्यवसायाला संधी आहे, म्हणून या व्यवसायात जायला पाहिजे म्हणून संधी हेरली. अर्थात, तोपर्यंत आयुष्यात कधीच आमचे कोणी हेलिकॉप्टरमध्ये बसलेले नव्हते. मी व्हिजिटिंग कार्ड बनवले. जुहू येथे गेलो.

सुरक्षा अधिकाऱ्याने हटकले. मला हेलिकॉप्टरचा व्यवसाय करायचा आहे, असे सांगितल्यावर मला हाकलून दिले.बाहेर आलो. हे प्रकरण जरा अवघड दिसते हे लक्षात आले. मला आठ वेळा गेटवरून हाकलून दिले. मंत्र्यांच्या ताफ्याला सहज आत जाऊ देतात, ही माहिती मिळाली. मग एकदा ताफ्यातून आतमध्ये गेलो. त्या वेळी मला हेलिकॉप्टरचा व्यवसाय करताना माझी लायकी आहे का, माहिती आहे का, असे कोणतेही प्रश्न पडले नाहीत. फक्त हेलिकॉप्टरचा आवाज सगळीकडे घुमत होता.’

मला हेलिकॉप्टरचा व्यवसाय करताना माझी लायकी आहे का, माहिती आहे का, असे कोणतेही प्रश्न पडले नाहीत. फक्त हेलिकॉप्टरचा आवाज सगळीकडे घुमत होता.
- मंदार भारदे, संचालक, मॅब एव्हिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com