मोसंबीने खाल्ला भाव 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

पुणे - मोसंबीला मिळाला विक्रमी भाव!... 700 रुपयांना तीन डझन ... मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात गेल्या तीन दिवसांपासून मोसंबीचे (जुना बहर) भाव वधारले आहेत. गेल्या काही वर्षांतील हा भावातील उच्चांक आहे. 

पुणे - मोसंबीला मिळाला विक्रमी भाव!... 700 रुपयांना तीन डझन ... मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात गेल्या तीन दिवसांपासून मोसंबीचे (जुना बहर) भाव वधारले आहेत. गेल्या काही वर्षांतील हा भावातील उच्चांक आहे. 

मोसंबीचे आंबे आणि मृग असे दोन बहर मानले जातात. मृग बहरात फळ हे सहा ते सात महिन्यांच्या कालावधीनंतर तोडले जाते, तर आंबे बहरामध्ये नऊ ते दहा महिन्यानंतर फळ तोडले जाते. मोसंबीचा सध्या मृग बहर सुरू झाला आहे. आंबे बहरातील मोसंबीची आवक संपत आली आहे. त्यामुळे भावात वाढ झाल्याचे मार्केट यार्ड येथील घाऊक फळ बाजारातील व्यापारी दासचंद्र पाटील यांनी सांगितले. 2015 मध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे फळबागांना पुरेसे पाणी मिळू शकले नव्हते. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला होता. आंबे बहराच्या मोसंबीचे उत्पादन घटले होते. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध होते, त्यांनी बागा जगविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा बहर सध्या सुरू झाला असून, याचे प्रमाण कमी असल्याने भाववाढ झाली आहे. 

मृग बहरातील फळ हे हिरव्या रंगाचे आणि कडक असते, तर आंबे बहरातील फळ हे गडद पिवळ्या, नारंगी रंगाचे आणि मऊ असते. मृग बहरातील मोसंबीला ज्यूस विक्रेत्यांकडून मागणी असते. तर आंबे बहरातील मोसंबीला घरगुती ग्राहकांडून पसंती मिळते. आंबे बहरातील मोसंबीला गोडवा अधिक असतो. गेल्या तीन दिवसांपासून जुन्या मोसंबीच्या भावात वाढ होत आहे. रविवारी तीन डझनाला 600 रुपये इतका भाव मिळाला, तर सोमवार आणि मंगळवारी 700 रुपये इतका भाव मिळत आहे. मार्केट यार्डातील व्यापारी बापू कानडे, उद्धव कावळे, बाळासाहेब कुंजीर यांनी हा माल खरेदी केला. 

Web Title: sweet lime prize increase

टॅग्स