मोसंबी उत्पादनाचे प्रमाण कमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

चार एकर क्षेत्रात ८०० झाडांची मोसंबीची बाग आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोसंबीला फळधारणा कमी आहे. त्यामुळे उत्पादनही कमी आहे. मात्र बाजारात मागणी चांगली असल्याने मोसंबीला जास्त भाव मिळत आहे.
- महादेव अकोलकर, करंजी गाव, पाथर्डी तालुका, जि. नगर

दुष्काळामुळे ४० टक्क्यांची घट; ४ डझनांमागे २०० रुपयांची वाढ
पुणे - नवरात्रोत्सवामुळे उपवासासाठी सर्वच फळांना मागणी आहे. जालना, औरंगाबाद, नगरच्या संत्र्याला बाजारात मागणी आहे. मोसंबी उत्पादित क्षेत्रात दुष्काळ असल्याने अावक जेमतेम आहे. दुष्काळामुळे यंदा मोसंबीचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ४० टक्‍क्‍यांनी घटले आहे. त्यामुळे मोसंबीच्या भावात तीन ते चार डझनांमागे २०० रुपयांनी भाव वाढ झाली आहे,

रंगाने हिरवट, पातळ सालीच्या आणि चवीला गोड असणाऱ्या मोसंबीचा हंगाम नुकताच सुरू झाला आहे. नगर येथून येणाऱ्या मोसंबीची फळबाजारात आवक वाढली आहे. नगर, जालना आणि औरंगाबाद येथून दररोज १०० ते ११० टन इतकी मोसंबीची आवक होते. 

सध्या बाजारात मोठ्या आकाराच्या ३ डझन मोसंबीस २५० ते ५०० रुपये भाव आहे. तर लहान आकाराच्या ४ डझन मोसंबीस १५० ते २५० रुपये इतका भाव मिळत आहे. 

गेल्या वर्षी ३ डझन मोसंबीस २५० ते ३००, तर ४ डझन मोसंबीस १०० ते १५० रुपये भाव मिळत होता.

मोसंबीचे व्यापारी रोहन उरसळ म्हणाले, ‘‘नगर भागात काही बागांना मुबलक पाणी उपलब्ध आहे. तर काही शेतकऱ्यांनी टॅंकरने पाणी देऊन बागा जगविल्या आहेत. चांगले पाणी मिळाल्याने फळाचा आकार, गोडी आणि दर्जा चांगला आहे. त्यामुळे नगर भागातील मोसंबीला ज्यूस विक्रेते, स्टॉलधारक, तसेच घरगुती ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. ऑक्‍टोबर अखेरपर्यंत मोसंबीचा हंगाम सुरू राहील.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sweetlime production less by drought