स्विग्गी, झोमॅटोला पावसाचा फटका; ऑर्डर निम्म्याने घटल्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

पुणे : पावसामुळे रस्त्यारस्त्यांवर झालेली वाहतूक कोंडी, सोसायट्यांमध्ये शिरलेले पाणी आणि दोन दिवस असलेल्या सुट्यांमुळे जेवणाचे पार्सल पुरविणाऱ्या कंपन्यांच्या सेवेला फटका बसला आहे. स्विग्गी, झोमॅटो व उबेर इटच्या ऑर्डर निम्म्याने घटल्या आहेत. 

पुणे : पावसामुळे रस्त्यारस्त्यांवर झालेली वाहतूक कोंडी, सोसायट्यांमध्ये शिरलेले पाणी आणि दोन दिवस असलेल्या सुट्यांमुळे जेवणाचे पार्सल पुरविणाऱ्या कंपन्यांच्या सेवेला फटका बसला आहे. स्विग्गी, झोमॅटो व उबेर इटच्या ऑर्डर निम्म्याने घटल्या आहेत. 

शहरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यात रविवारपासून मुठा व मुळा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. या सर्वांत काही दुर्घटना होऊ नये म्हणून शहरातील अनेक कंपन्या, शाळा व महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणाहून येणाऱ्या ऑर्डर जवळपास थांबल्या आहेत. तर सुट्यांमुळे नोकरदार वर्ग घरीच असल्याने घरून येणाऱ्या ऑर्डर देखील तुलनेने कमी झाल्या आहेत. तर पावसामुळे ऑर्डर लवकर येणार नाही किंवा ऑर्डर डिलिव्हरी करणे शक्‍य होणार नाही, अशी भावना निर्माण झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून ऑर्डर निम्म्याने कमी झाल्याची माहिती शहरातील काही हॉटेल चालकांनी दिली. 

सोमवारी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पाणी साचल्याने अनेक रस्ते बंद करण्यात आले होते. मुख्य रस्ते बंद झाल्याने पर्यायी मार्गांवर वाहतुकीचा ताण आला. त्यामुळे एखाद्याने कंपनीकडे जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर वेळेत डिलिव्हरी होत नव्हती. पाणी साचलेल्या ठिकाणावरून ऑर्डर आल्यास डिलिव्हरी बॉयला तिथपर्यंत पोचणे शक्‍य होत नव्हते. त्यामुळे अनेकांना जेवण मिळणे मुश्‍कील झाल्याची स्थिती होती. 

ऑर्डर पोचविण्यात अनेक अडचणी 
गेल्या तीन दिवसांपासून जेवणाच्या ऑर्डर 50 ते 60 टक्के कमी झाल्या आहेत. पावसामुळे मागणीत घट झाली असावी, अशी माहिती वैशाली हॉटेलच्या प्रशासनाकडून देण्यात आली. तर पावसामुळे ऑर्डर पोचविण्यात अनेक अडचणी येत आहे. पार्सल आणि मोबाईलची सर्वाधिक काळजी घ्यावी लागते. पावसामुळे अपघात देखील होण्याची शक्‍यता असते, असे 'झोमॅटो'च्या डिलिव्हरी बॉयने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swiggy, Zomato Orders dropped by half Due to rainfall in Pune