#SwimmingPool जलतरण तलावांमधील सुरक्षितता वाऱ्यावरच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

पुणे - कोंढव्यातील एका मोठ्या सोसायटीच्या जलतरण तलावाभोवती खेळणाऱ्या दोन मुली रविवारी दुपारी पाण्यात पडल्या. पालकांनी याकडे तत्काळ लक्ष दिल्याने त्यांना रुग्णालयात पोचवून त्यांचा जीव वाचविण्यास डॉक्‍टरांना यश आले. या घटनेमुळे शहरातील मोठ्या सोसायट्या आणि सार्वजनिक जलतरण तलावांच्या ठिकाणी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

पुणे - कोंढव्यातील एका मोठ्या सोसायटीच्या जलतरण तलावाभोवती खेळणाऱ्या दोन मुली रविवारी दुपारी पाण्यात पडल्या. पालकांनी याकडे तत्काळ लक्ष दिल्याने त्यांना रुग्णालयात पोचवून त्यांचा जीव वाचविण्यास डॉक्‍टरांना यश आले. या घटनेमुळे शहरातील मोठ्या सोसायट्या आणि सार्वजनिक जलतरण तलावांच्या ठिकाणी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

मोठमोठ्या सोसायट्यांच्या ऍमिनिटीमध्ये जलतरण तलावांचा समावेश असतो. या तलावांचा वापर सोसायट्यांमधील रहिवासी व त्यांच्या मुलांकडून करण्यात येतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने काही सोसायट्या जीवरक्षकही नेमतात. मात्र, अनेकदा काहीसे दुर्लक्ष झाल्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्‍यता असते. सोसायट्यांच्या जलतरण तलावामध्ये रहिवासी, त्यांची मुले येतात. अनेकदा मुले तलावाच्या डेकवर, पाण्यामध्ये एकमेकांशी दंगामस्ती करतात. तसेच, जास्त खोल पाण्यामध्ये जातात. मोठ्या सोसायट्यांच्या बागेजवळच जलतरण तलाव असतात. तेथे लहान मुले खेळताना पाण्यात पडून बुडू शकतात. अशा वेळी जीवरक्षक, पालक किंवा सुरक्षारक्षक जागेवर नसल्यास किंवा सुरक्षिततेची काळजी न घेतल्यास एखाद्याचा जीव जाण्याची शक्‍यता असते. त्यामुळे सोसायट्यांनी सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

महापालिका किंवा खासगी जलतरण तलावामध्ये सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. सोसायट्यांमध्ये तेवढे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळेच अनुचित घटना घडतात. अशा घटना टाळण्यासाठी जीवरक्षक, सुरक्षारक्षक, जलतरण तलावाची देखभाल-दुरुस्ती, सुरक्षिततेची साधनसामग्री ठेवण्यावर भर दिला पाहिजे. विशेषत- लहान मुले तलावाभोवती असताना अधिक काळजी घेतली पाहिजे. 
- सौरभ देशपांडे, जलतरण प्रशिक्षक, टिळक जलतरण तलाव, डेक्कन जिमखाना 

जलतरण तलावांची सद्य-स्थिती व सुरक्षिततेची पाहणी करण्यासाठी महापालिकेने समिती स्थापन केलेली आहे. समितीच्या बैठकीतील चर्चेनुसार महापालिकेच्या अभियंत्यांकडून जलतरण तलावांची पाहणी केली जाते. तेथील तलावाची उंची, पाणी, सुरक्षिततेच्या उपाययोजनांची पाहणी होते. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यादृष्टीने सोसायट्यातील रहिवासी, पालकांमध्ये जागृती केली जाते. 
- सुरेश जगताप, सहआयुक्त, महापालिका 

जलतरण तलाव असणाऱ्या सोसायट्यांनी सुरक्षिततेची खबरदारी घेतली पाहिजे. तलावाच्या स्वच्छतेपासून सुरक्षिततेपर्यंतच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. निष्काळजीपणा केल्यास एखाद्याचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे सोसायट्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. 
- सुहास पटवर्धन, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ 

...अशी घ्यावी काळजी 
- जलतरण तलावाची वेळ निश्‍चित करणे 
- जलतरण तलावाच्या ठिकाणी प्रशिक्षित जीवरक्षक नेमणे 
- मुले पोहताना पालकांनी उपस्थित राहणे 
- ऑक्‍सिजन सिलिंडर/प्रथमोपचाराची साधनसामग्री उपलब्ध असणे 
- शुद्ध पाणी ठेवण्याबरोबरच तळाशी निळ्या रंगाच्या टाइल्स बसविणे 
- तलावाची खोली दर्शविणारे आकडे स्पष्टपणे मांडणे 
- जलतरण तलाव बंद असताना सुरक्षारक्षकाने अधिक लक्ष देणे 

- शहरातील खासगी जलतरण तलाव - 450 
- महापालिकेचे जलतरण तलाव - 30

Web Title: swimming pool Security issue in pune