जलतरण तलावांवर ‘हेराफेरी’

सागर शिंगटे
मंगळवार, 17 एप्रिल 2018

पिंपरी - यंदाच्या उन्हाळ्याच्या हंगामात देखील शहरातील जलतरण तलावांवरील लिपिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून संगनमताने तिकिटांची ‘हेराफेरी’ केली जात आहे. महापालिकेच्या तिजोरीत जाणाऱ्या पैशांवर खुलेआम डल्ला मारला जात आहे. त्यामुळे, पालिका प्रशासनाने आता त्याला आळा घालण्यासाठी थेट स्वतंत्र दक्षता पथकच नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामार्फत सर्व जलतरण तलावांचे जागेवर जाऊन लेखापरीक्षण (स्पॉट ऑडिट) केले जाणार आहे. 

ऐन उन्हाळ्याच्या हंगामात मागील काही वर्षांपासून शहरातील जलतरण तलावांवरील लिपिक व सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संगनमताने लुटमार केली जात आहे. यंदाचा उन्हाळ्याचा हंगामही त्याला अपवाद राहिलेला नाही. पूर्वी, जलतरण तलावांवर पोहण्यासाठी येणाऱ्या लोकांना तिकीट खिडकीवरून लिपिकामार्फत, तीन भागांचे तिकीट दिले जात असे. त्यातील एक भाग स्वतः लिपिकाकडे ठेवत असे. दुसरा भाग सुरक्षा कर्मचारी आणि तिसरा भाग पोहण्यासाठी येणाऱ्या संबंधित व्यक्तीला दिला जात होता. परंतु, सुरक्षा कर्मचारी स्वतःकडील तिकिटाचा भाग पुढील बॅचमधील लोकांना पुन्हा अनधिकृतरीत्या विकून पैसे जमा करत होते.

तिकिटांची ‘हेराफेरी’ लक्षात आल्याने दोन भागांची नवीन तिकिटे छापण्यात आली. त्यानुसार, आता त्या तिकिटातील एक भाग लिपिकाकडे, तर दुसरा भाग पोहण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीला दिला जात आहे. तसेच, त्यामागे विविध सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र, इतके करूनही पालिकेच्या पैशांवर सफाईदारपणे डल्ला मारला जात आहे.      

लिपिक संशयाच्या भोवऱ्यात?
एका जलतरण तलावावर पालिकेतील उच्चपदस्थ नेत्याचा चुलत भाऊ लिपिकाचे काम करत असून, त्याचे व्यवहारही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. थेट नेत्याशीच त्याचे नातेसंबंध असल्याने तो कोणालाही जुमानत नसल्याचे क्रीडा विभागातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याच्यावरही कारवाई होणार काय, याकडेही आता लक्ष राहणार आहे. 

दक्षता पथकाकडून अचानक तपासणी होणार !
जलतरण तलावांवरील भरणा कमी होत असल्याने दक्षता पथकाकडून तलावांवर अचानक भेट देऊन तेथील तपासणी केली जाणार आहे. पोहण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या, प्रत्यक्षातील भरणा, तिकिटे व्यवस्थित दिली जात आहेत किंवा नाही यासारख्या बाबींवर मुख्यत्वे लक्ष दिले जाणार आहे.

जलतरण तलावांवरील दैनंदिन कामकाजाची आता दक्षता पथकामार्फत, अचानक तपासणी (स्पॉट ऑडिट) केली जाणार आहे. त्यामध्ये, किती लोक पोहायला आले? भरणा किती झाला? यासह इतर बाबींचीही तपासणी होणार आहे.’’ 
- मनोज लोणकर, सहायक आयुक्त (क्रीडा), पिंपरी- चिंचवड महापालिका

Web Title: swimming tank issue