उन्हाळ्यातही स्वाइन फ्लूचा ताप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मे 2019

शहरात स्वाइन फ्लूचे पाच रुग्ण व्हेंटिलेटर असून, कडक उन्हाळ्यातही स्वाइन फ्लूच्या रुग्णांची वाढती संख्या डॉक्‍टरांपुढे चिंतेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे स्वाइन फ्लूची लक्षणे दिसताच रुग्णांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यासाठी डॉक्‍टरांकडे जावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

पुणे - शहरात स्वाइन फ्लूचे पाच रुग्ण व्हेंटिलेटर असून, कडक उन्हाळ्यातही स्वाइन फ्लूच्या रुग्णांची वाढती संख्या डॉक्‍टरांपुढे चिंतेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे स्वाइन फ्लूची लक्षणे दिसताच रुग्णांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यासाठी डॉक्‍टरांकडे जावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

सर्वसाधारणतः जून-जुलैनंतर स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे मागील दहा वर्षांमध्ये दिसून आले आहे. या वर्षी राज्यात कमाल तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदला जात असतानाही स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने डॉक्‍टर चिंता व्यक्त करीत आहेत. याबाबत बोलताना डॉ. सचिन गांधी म्हणाले, ‘‘पावसाळा आणि नंतर हिवाळा या ऋतूंमध्ये बहुतांश रुग्णांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे आढळतात. परंतु, यंदा मे महिन्यातही स्वाइन फ्लूची लक्षणे असणारे रुग्ण दिसत आहेत.’’

महापालिकेचे सहायक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, ‘‘स्वाइन फ्लूच्या ‘एच१एन१’ या विषाणूंमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पुण्यातील डॉक्‍टरांना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णांना वेळेत उपचार मिळत आहेत.’’

शहरात जानेवारीपासून स्वाइन फ्लूचे १२८ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सहा रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. यापैकी पाच रुग्ण व्हेंटिलेटर आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. शहरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे निदान उशिरा होते. तसेच, ते उपचारासाठी उशिरा दाखल होतात. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर ठेवावे लागते. सध्या व्हेंटिलेटरवर उपचार घेणारे पाचपैकी चार रुग्ण शहराबाहेरील असल्याचेही सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swine flu fever in summer