पुणे शहरात स्वाइन फ्लूचे दहा रुग्ण अत्यवस्थ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

पुणे - शहरात स्वाइन फ्लूचे दहा रुग्ण अत्यवस्थ असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत शहरामध्ये स्वाइन फ्लूच्या २१ रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडले आहे. 

पावसाळी वातावरणात स्वाइन फ्लूच्या ‘एच१एन१’ विषाणूंचा संसर्ग वाढतो. हवेतील आर्द्रता वाढल्याने या विषाणूंच्या संसर्गासाठी पोषक वातावरण तयार होते. त्यामुळे जून ते सप्टेंबर या दरम्यान स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले आहे. 

पुणे - शहरात स्वाइन फ्लूचे दहा रुग्ण अत्यवस्थ असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत शहरामध्ये स्वाइन फ्लूच्या २१ रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडले आहे. 

पावसाळी वातावरणात स्वाइन फ्लूच्या ‘एच१एन१’ विषाणूंचा संसर्ग वाढतो. हवेतील आर्द्रता वाढल्याने या विषाणूंच्या संसर्गासाठी पोषक वातावरण तयार होते. त्यामुळे जून ते सप्टेंबर या दरम्यान स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले आहे. 

शहरात जानेवारीपासून जूनपर्यंत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या अत्यल्प होती. गेल्या दोन महिन्यांपासून या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नोंदविण्यात आले आहे.

स्वाइन फ्लूची लक्षणे दिसणाऱ्या ८१८ रुग्णांच्या घशातील द्रव पदार्थांचे नमुने जानेवारीपासून तपासण्यात आले. त्यापैकी आतापर्यंत ४० रुग्णांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले आहे. त्यातील २१ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. या रुग्णांना औषधोपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. मात्र, १६ रुग्णांवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्यापैकी दहा रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर उपचार करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. 

स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस मोठ्या प्रमाणात देण्यात येत असल्याने गेल्या दोन वर्षांपासून या रोगाच्या संसर्गाचे प्रमाण रोखण्यात यश आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. यंदाही तशीच उपाययोजना करण्यात आली आहे.

पिंपरीत आठ रुग्ण बाधित
पिंपरी - स्वाइन फ्लूबाधित आठ रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यातील तीन जण कृत्रिम श्‍वासोच्छ्वासावर आहेत. १६ जणांना उपचार करून सोडण्यात आले आहे. शहरात एक जानेवारीपासून आतापर्यंत १०६ रुग्णांना स्वाइन फ्लूच्या उपचारासाठी रुग्णालयांमध्ये करण्यात आले. त्यातील ७७ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. 

मावळात एक बळी
सोमाटणे - सोमाटणे येथे स्वाइन फ्लूच्या रुग्णाचा उपचारादरम्यान प्रौढाचा रविवारी (ता. २६) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांना सर्दी, खोकला, ताप आल्यामुळे काही दिवस घरगुती उपचार केले; परंतु आजार वाढत गेल्यावर त्यांना शुक्रवारी सोमाटणे येथील रुग्णालयात दाखल केले. त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल केले. दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मावळात स्वाइन फ्लूचा हा पहिला बळी ठरला आहे. मावळात आणखी रुग्ण असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, तापाची लक्षणे जास्त दिवस राहिल्यास रुग्णांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन आवाहन डॉक्‍टरांनी केले.

दृष्टिक्षेपात स्वाइन फ्लू
तपासलेले रुग्ण - ५ लाख ६८ हजार ६२१
औषध दिलेले रुग्ण - ५ हजार ४६१
चाचणी केलेले रुग्ण  - ८१८
निदान झालेले रुग्ण  - ४०
व्हेंटिलेटवरील रुग्ण - १० 
(स्रोत - आरोग्य विभाग, पुणे महापालिका)

Web Title: Swine Flu H1N1 Sickness Healthcare