स्वाइन फ्लूचे रुग्ण घटले

Swine-Flu
Swine-Flu

पुणे - स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस, त्यातून निर्माण झालेली सामूहिक प्रतिकार शक्‍ती, जनजागृती आणि लवकर निदानावर प्रभावी उपचार या चतुःसूत्रीमुळे पुण्यात या वर्षी एच१एन१ विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाले. या आजाराला रोखण्यासाठी सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांनी गर्दीत न जाण्याचे आवाहन आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे.

‘एच१एन१’ या हवेतून पसरणाऱ्या विषाणूंमुळे शहरातील १७२ रुग्णांना दहा महिन्यांमध्ये स्वाइन फ्लूचा संसर्ग झाला. यापैकी ६७ जण हे पुण्यातील, तर १०५ जण हे राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून शहरातील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले होते. स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या या वर्षात आतापर्यंत ४९ असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली. 

शहरात ताप, थंडी, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सकाळी आकाश अंशतः ढगाळ होते. दुपारी ‘ऑक्‍टोबर हीट’चा चटका आणि संध्याकाळी काळ्या कुट्ट ढगांनी आकाश व्यापून कोसळणारा पाऊस, असे वातावरण काही दिवसांपासून शहर आणि परिसरात आहे. कमाल आणि किमान तापमानातील तफावतही या वातावरणामुळे वाढत आहे, असे निरीक्षण हवामान खात्यातर्फे टिपण्यात आले. असे विषम वातावरण विषाणूजन्य आजारांसाठी पोषक असते. स्वाइन फ्ल्यूच्या ‘एच१एन१’ विषाणूंच्या वाढीसाठीही हे अनुकूल असते. त्यामुळे काही दिवसांपासून स्वाइन फ्लूची शक्‍यता असलेल्या, त्यांची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांची प्रमाण वाढत आहे. 

सामान्य फ्लूची आणि स्वाइन फ्लूची बहुतांश लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे अशा लक्षणांमुळे स्वाइन फ्लूचे पटकन निदान करणे आव्हानात्मक असते. त्यासाठी फ्लूची लक्षणे असणाऱ्या सामान्य रुग्णांनाही टॅमिफ्लूचे औषध देण्याची सूचना आरोग्य खात्याने केली आहे.
 
रुग्णांचा तपशील                                    २०१८                    २०१९
तपासलेल्या रुग्णांची संख्या ................. ९,५३,५५३         .....  ८०लाख
टॅमिफ्लू दिलेले रुग्णांची संख्या ............. १८ हजार   ......... १४ हजार ७७ 
उपचारांसाठी दाखल झालेले रुग्ण ......... ३ हजार २१७ .....  १ हजार ८५८
उपचारांनंतर घरी सोडलेले रुग्ण ........... ३ हजार ७८ ........ एक हजार ८०४
एकूण मृत्यू ........................................    ५९२ .............. १७२
शहरातील मृतांची संख्या ........................  ३१९ ............... ६७
पालिका हद्दीबाहेरचे मृत रुग्ण ............          २७३ .............. १०५

- पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते.
- लहान मुले, ज्येष्ठ, मधुमेही, हृदयविकाराचे रुग्ण, गर्भवती या अतिजोखमीच्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.
- गर्दीमुळे स्वाइन फ्लू आजार पसरण्यास मदत होते.
- शिंकणे, खोकणे यातून प्रसार होतो. 

हे करा 
- वारंवार साबणाने स्वच्छ हात धुवा
- पौष्टिक आहार घ्या
- भरपूर पाणी प्या
- पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या

हे टाळा
- हस्तांदोलन
- सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका
- डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका
- फ्लूची लक्षणे असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा

या वर्षी महापालिकेने जनजागृतीवर भर दिला. महापालिकेच्या डॉक्‍टरांबरोबरच खासगी प्रॅक्‍टिस करणाऱ्या डॉक्‍टरांनाही प्रशिक्षण देण्यात आले. या सर्व डॉक्‍टरांना स्वाइन फ्लूच्या उपचारांच्या अद्ययावत ‘गाइड लाइन’ दिली होती. त्याच बरोबर प्रत्येक रुग्णाला वेळेत मिळालेले उपचार, या सर्वांमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका. 

पावसाळ्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढते. मात्र गेल्या वर्षी जुलैपासून स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. एप्रिलनंतर या रुग्णांचे प्रमाण कमी झाले. तोपर्यंत सामूहिक प्रतिकारशक्ती तयार झाली. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांचे प्रमाण कमी दिसले.
- डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com