अभ्यासक्रमाची पुनर्रचना

अभ्यासक्रमाची पुनर्रचना

आठ लाख अभियंत्यांपैकी ६० टक्के पदवीधरांना मिळत नाही रोजगार 
पुणे - दरवर्षी अभियांत्रिकी पदवी घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या आठ लाख अभियंत्यांपैकी ६० टक्के पदवीधरांना रोजगार मिळत नसल्याचे वास्तव अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेसारख्या (एआयसीटीई) केंद्र सरकारी यंत्रणेने समोर आणले. याची दखल घेऊन ‘एआयसीटीई’ने उद्योगांना पूरक अशा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेसाठी विषय तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. 

 अभियांत्रिकी प्रवेशासाठी पुढील वर्षी राष्ट्रीय स्तरावर परीक्षा घेण्याचा निर्णय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतला आहे. काही खासगी एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणात तर दरवर्षी उत्तीर्ण होणारे ७० टक्के अभियंता रोजगारक्षम नसतात, असे आढळले आहे. काही उद्योगांच्या प्रतिनिधींशी संवाद साधल्यानंतर त्यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत प्रश्‍न उपस्थित केले आहेत. यात बदल करण्यासाठी अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात कालसुसंगत बदल आणि प्राध्यापकांचे प्रशिक्षण ही तातडीची गरज उद्योगांनी व्यक्त केली आहे.  

महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन बाहेर पडणारा पदवीधर केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन येतो. एक ब्रास बांधकामाला किती विटा लागतील, हेदेखील त्यांना सांगता येत नाही. त्यामुळे अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याबरोबरच सनदी लेखापालांना जशी आर्टिकलशिप असते, त्याप्रमाणे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनादेखील सहा महिने प्रत्यक्ष ‘साइट’वर जाऊन अनुभव घेण्याची सक्ती केली पाहिजे. अभ्यासक्रमात स्थापत्यकलेबरोबरच वास्तुकलेचा भाग अधिक असला पाहिजे.
- गजेंद्र पवार, अध्यक्ष, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना

सध्या अभियांत्रिकी महाविद्यालयांतून बाहेर पडणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शाखेचे मूलभूत ज्ञानही नसते. या महाविद्यालयांत रोजगारक्षम विद्यार्थी घडवायचे असतील, तर तीन स्तरांवर काम करावे लागेल. एकतर सक्षम प्राध्यापक आणि पायाभूत सुविधा नसलेल्या महाविद्यालयांबाबत कठोर निर्णय घ्यावे लागतील. प्राध्यापकांच्या ज्ञानवृद्धीसाठी प्रयत्न आणि त्यांना कालसुसंगत गरजांचे प्रशिक्षण द्यावे लागेल; तसेच अभ्यासक्रमात कालसुसंगत बदल करावे लागतील. अभियांत्रिकी शाखेकडे येणाऱ्या विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्तादेखील जोखण्याची गरज आहे. यातूनच उद्योगांना हवे असलेले मनुष्यबळ तयार होईल. 
- डॉ. अभय जेरे,  मुख्य शास्त्रज्ञ, पर्सिस्टंट

वैद्यकीय महाविद्यालयांना जोडून रुग्णालये असतात. त्या ठिकाणी रुग्णांना मोफत उपचार दिले जातात. यामुळे असंख्य रुग्ण येतात. त्यांच्यावरील उपचारांतून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळते. त्याप्रमाणे अभियांत्रिकी महाविद्यालयांना जोडून दुरुस्तीच्या कार्यशाळा नाहीत. समाजातील यंत्रांच्या समस्या सोडविण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे अभियांत्रिकी पदवी घेऊन विद्यार्थी बाहेर पडला, तरी त्याला प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसतो. तो केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन बाहेर पडतो. म्हणून तो रोजगारक्षम असत नाही. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्राध्यापकाला शस्त्रक्रियेचे संपूर्ण ज्ञान असते. तो स्वत: शस्त्रक्रिया करू शकतो; परंतु अभियांत्रिकी महाविद्यालयांतून अनेक प्राध्यापकांकडे इम्पोर्टेड वस्तूंची यांत्रिक दुरुस्तीक्षमता नसते. हे बदलल्यास रोजगारक्षम विद्यार्थी घडतील आणि ते यशस्वी उद्योजक बनतील.
- शेखर कुलकर्णी, संस्थापक, इर्म्पोट सबस्टिट्यूटन फाउंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com