तडीपार गुन्हेगारांचा वाढतोय वावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

तडीपार गुन्हेगाराला अटक करून ठेवता येत नाही. शहरात आढळल्यावर त्याला तातडीने जिल्ह्याबाहेर सोडले जाते. त्यानंतरही संबंधित गुन्हेगार शहरात आल्यास त्याच्यावर तातडीने कारवाई केली जाते.   
- रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त

पिंपरी - दिनेश शिंगाडे...एक वर्षासाठी तडीपार...महिनाभरापूर्वी पिंपरीतून ताब्यात. गंग्या वाघमारे...दोन वर्षांसाठी तडीपार...आठ दिवसांपूर्वी थेरगावातून ताब्यात...रावण टोळीचा म्होरक्‍या दशरथ ऊर्फ सागर ऊर्फ ससा राजकुमार वाघमोडे...दोन वर्षांसाठी तडीपार...पाच दिवसांपूर्वी आकुर्डीतून ताब्यात. ही झाली केवळ तीन उदाहरणे. मात्र, तडीपार गुन्हेगारांना पुन्हा ताब्यात घेतल्याने त्यांचा शहरातील वावर अधोरेखित होत आहे. पोलिसांच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर तडीपारीचा प्रस्ताव ठेवला जातो. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर गुन्हेगाराला सहा महिने, एक वर्ष, दोन वर्षे अशा कालावधीसाठी पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून तसेच जिल्ह्यातून तडीपार केले जाते. तडीपार गुन्हेगार पुन्हा त्या कालावधीत शहरात वावरू शकत नाही. मात्र, तरीही पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या विविध पोलिस ठाण्यांच्या अखत्यारीतील ८८ गुन्हेगार तडीपार आहेत. यापैकी बहुतेक गुन्हेगार तडीपारीच्या कालावधीतही शहरात बिनधास्त वावरत आहेत. मात्र, पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. 

कारवाई केवळ कागदोपत्री
गुन्हेगाराला हद्दीतून तडीपार केल्यास त्याच्या कृत्यांना आळा बसेल यासाठी ही कारवाई केली जाते. मात्र, असा गुन्हेगार या कालावधीत शहरात पुन्हा वावरणार नाही, याकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अशा गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी ठाण्यातील पोलिसांसह विविध पथकांचीही नेमणूक केलेली असते. तरीही पोलिस यंत्रणेला या गुन्हेगारांचा शोध लागत नाही.

पोलिस त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने हे गुन्हेगार हद्दीत येऊन गुन्हेगारी कृत्ये सुरू ठेवतात. त्यामुळे तडीपारीची कारवाई केवळ कागदोपत्रीच राहते का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

पोलिस ठाणे         तडीपार 
 पिंपरी          १७
 चिंचवड     १२
 वाकड        १६
 भोसरी एमआयडीसी     १२
 भोसरी     ०१
 चाकण       ०४
 निगडी        ०८
 सांगवी     ०९
 हिंजवडी        ०१
 दिघी        ०८
एकूण       ८८


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tadipaar Criminal Crime