सनबर्न फेस्टिवलच्या आयोजनाचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

गोव्यात 2007 मध्ये हे फेस्टिव्हल झाले होते. सनबर्नकडून करचुकवेगिरी झाल्याने तिथे त्याला परवानगी नाकारण्यात आली आहे. हा फेस्टिव्हल आता पुण्यात होणार आहे. या कार्यक्रमात अमली पदार्थांचे सेवन होत असल्याचे आरोप करत सनातन संस्थेनेही याला विरोध केला आहे.

मुंबई - पुण्यातील केसनंद या गावाजवळ आजपासून (बुधवार) सुरु होणाऱ्या सनबर्न फेस्टिवलच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. 

सनबर्नच्या आयोजनाला तहसीलदारांनी परवानगी दिलेली आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयात दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे सनबर्न फेस्टिवलच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

केसनंद या गावाजवळ बुधवारी दुपारी 2 पासून सुरू होणारे सनबर्न फेस्टिव्हल चार दिवसांचा आहे. मुख्य रस्त्यापासून 1,200 मीटरच्या आत हे ठिकाण आहे. यातील सव्वा किलोमीटरचा रस्ता जंगलातून जातो. रस्ता तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. याबाबत तहसीलदारांनी वनाधिकाऱ्यांकडे तक्रारही दिली आहे. फेस्टिव्हल होत असलेल्या जागेचे सहमालक दत्तात्रय पासलकर यांचीही यासाठी परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे त्याला परवानगी नाकारावी आणि बेकायदा वृक्षतोड करणाऱ्या आयोजकांवर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. पण, न्यायालयाने या प्रकरणात सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

गोव्यात 2007 मध्ये हे फेस्टिव्हल झाले होते. सनबर्नकडून करचुकवेगिरी झाल्याने तिथे त्याला परवानगी नाकारण्यात आली आहे. हा फेस्टिव्हल आता पुण्यात होणार आहे. या कार्यक्रमात अमली पदार्थांचे सेवन होत असल्याचे आरोप करत सनातन संस्थेनेही याला विरोध केला आहे. सनातनचा हा आरोप आयोजकांनी फेटाळून लावला आहे. राज्याच्या पर्यटन विभागाचा या फेस्टिव्हलला पाठिंबा असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

Web Title: tahsildar allows sunburn festival in pune