बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा फार्स

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

पिंपरी - पिंपरी कॅम्प परिसरातील शगुन चौक व साई चौक परिसरात पिंपरी वाहतूक विभागाच्या वतीने गुरुवारी (ता. २०) वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.

पिंपरी - पिंपरी कॅम्प परिसरातील शगुन चौक व साई चौक परिसरात पिंपरी वाहतूक विभागाच्या वतीने गुरुवारी (ता. २०) वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.

‘सकाळ’ने गुरुवारच्या अंकात ‘शगुन चौकात वाहतुकीचा खोळंबा’ हे वृत्त प्रसिद्ध केली होते. याची दखल घेत पिंपरी वाहतूक विभागाने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली. मात्र, महापालिकेकडून व्यापारी, दुकानदार व मोबाईल कंपन्यांनी रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई होणे गरजेचे आहे; परंतु महापालिका पिंपरी कॅम्प वाहतूक समस्येबाबत गंभीर नसल्याने कारवाई होत नाही. शगुन चौकात बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करीत असताना अनेक मुजोर वाहनचालक व स्थानिक व्यापाऱ्यांनी ‘तुम्हाला काय करायचे ते करा, आम्ही याच रस्त्याने जाणार’, तर एका व्यापाऱ्याने पोलिसालाच दमदाटी करत ‘लाचखोर’ म्हणत हुज्जत घातल्याचे पाहावयास मिळाले. एकाने मोटार विरुद्ध दिशेला रस्त्यात पार्क करून खरेदीसाठी गेला, परत आल्यानंतर त्याने पोलिसांनी टायरला लावलेले जॅमर पाहिला व पोलिसांवर भडकला.

वर पोलिसांनाच ‘तुम्ही कोणाच्या गाडीला जॅमर लावला आहे, माहीत आहे का, टायरच्या मॅकव्हीलला जॅमरमुळे रेषा पडल्या आहेत. त्याचाच खर्च तुम्ही द्या,’’ असे बोलत पोलिसांनाच अरेरावी करू लागला. पोलिसांनी दंड घेऊन सोडले. वाहनचालक वाहतुकीचे नियम न पाळता उलट पोलिसांनाच दमदाटी करतात. त्यामुळे पोलिसांचे मानसिक खच्चीकरण झाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.

वाहतूक विभागाकडे कर्मचारी संख्या कमी असल्याने कारवाईस अडचणी येतात. हातगाड्या व अतिक्रमणांवर महापालिकेने कारवाई करणे गरजेचे आहे. 
- रवींद्र निंबाळकर,  पोलिस निरीक्षक, पिंपरी वाहतूक विभाग

पिंपरी कॅम्पमधील होणारी वाहतूक कोंडी ही अतिक्रमणांमुळेच होत असून, लवकरच पोलिसांबरोबर संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे.
- तानाजी शिंदे,  अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Web Title: Take action against unassured drivers