#PuneCrime गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा

#PuneCrime गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा

पुणे : शांत शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहराच्या गल्लीबोळातही आता गोळीबाराच्या घटना घडत आहेत. त्यातच दोन महिन्यांत दोनदा झालेल्या डबल-ट्रिपल फायरींगने शहराला "व्हायब्रंट' केले. सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर असणाऱ्या पोलिसांवरच थेट गोळीबार करण्याची गुन्हेगारांची मजल गेल्यामुळे गुन्हेगारांना अभय दिले जात आहे काय?, असा प्रश्‍न सर्वसामान्य पुणेकर उपस्थित करू लागले आहेत. 

देशातील अन्य शहरांच्या तुलनेत शांत शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये अनेकजण निवृत्तीनंतरचे आयुष्य घालविण्यावर भर देतात. मात्र, आता हे शहर थोड्याफार प्रमाणात व्हायब्रंट बनू लागले आहे. त्याचे कारण आहे, गुन्हेगारांकडून होणाऱ्या गोळीबाराच्या घटना. बुधवारी एकाच दिवशी शहरात तीन ठिकाणी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने त्यावर शिक्कामोर्तब केले. यात दोघांचा मृत्यू झाला तर एका पोलिस अधिकाऱ्यावर आरोपींनी तीन गोळ्या झाडल्याने सर्वसामान्य पुणेकरांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. 

जानेवारीपासून शहरात गोळीबाराच्या घटनांची संख्या वाढत चालली आहे. किरकोळ भांडणापासून पूर्ववैमनस्य आणि टोळ्यांमधील भांडणामध्ये दिवाळीतील फटाक्‍यांप्रमाणे गोळीबाराच्या घटना घडत आहेत. मात्र, त्या रोखण्यासाठी पोलिसांकडून ठोस प्रयत्न झाले नाहीत. परिणामी, गुन्हेगारांचे मनोबल वाढून प्रत्येक महिन्यात किमान एक-दोन तरी गोळीबाराच्या घटना घडत आहे.

डॉ. के. व्यंकटेशम यांनी पोलिस आयुक्तपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर तरी या घटनेत सुधारणा होण्याची पुणेकरांना अपेक्षा होती, मात्र तसे घडले नाही. याउलट गोळीबाराच्या घटना दोनदा घडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. 

गोळीबारानेच 2018 ची सुरवात 

बांधकाम व्यावसायिक देवेंद्र शहा यांच्यावर 13 जानेवारीला रात्री साडेअकरा वाजता दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या होत्या. डेक्कन परिसरातील प्रभात रस्त्यावरील इमारतीत हा प्रकार घडला होता. या प्रकरणातील आरोपींना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोका) अटक केली. 

डबल फायरींगमुळे ऑक्‍टोबर "हीट' 

पैशांच्या देवाण-घेवाणीवरुन देवानंद ढोकणे या वकिलावर दुचाकीवरील दोघांनी 22 ऑक्‍टोबरला रात्री संगम पुलावर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक केली. तसेच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विशाल शिवाजी ढोरे या पदाधिकाऱ्यावर राजकीय वैमनस्यातून गोळीबार झाला होता. त्यातील आरोपींनाही पोलिसांनी अटक केली. या डबल फायरींगमुळे शहर हादरले होते. तर 31 ऑक्‍टोबरला शुक्रवार पेठेत दोन गटांमधील भांडणात गोळीबार झाला होता. 

ट्रिपल फायरींगमध्ये दोघांचा मृत्यू

21 नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता चंदननगरमधील एकता भाटी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला. त्यानंतर दोन्ही आरोपी पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांचा पुणे रेल्वे स्थानकात शोध घेतला. त्याचवेळी एका आरोपीने गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर गोळीबार केला.

दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. या दोन घटनांदरम्यान येवलेवाडीत सराफी पेढीमध्ये दुपारी सोने खरेदीच्या निमित्ताने हल्लेखोर घुसले. त्यांनी कामगारावर गोळी झाडून पळ काढला. या घटनेत अमृत परिहार या कामगाराचा मृत्यू झाला. 
 

या वर्षातील गोळीबाराच्या घटना जखमी/मृत्यू ठिकाण दिवस 

* किरकोळ भांडणातून टोळक्‍याचा गोळीबार - एक जखमी - रामटेकडी - 14 मार्च 
* सराईत गुन्हेगाराकडून गोळीबार - एक जखमी - दत्तवाडी - 25 जून 
* मैत्रीणीवरील शेरेबाजीमुळे रेस्टॉरंटमध्ये गोळीबार - जखमी नाही - मुंढवा - 7 ऑगस्ट 
* किरकोळ कारणावरून तरुणावर गोळीबार - एक जखमी - पुणे विद्यापीठ चौक - 18 ऑगस्ट 
* दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीवर गोळीबार - एक जखमी - ताडीवाला रस्ता - 13 सप्टेंबर 
* दोन गटातील भांडणातून गोळीबार - एक जखमी - शुक्रवार पेठ - 31 ऑक्‍टोबर 

गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी काय करावे? आपले मत कळवा... 
फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्राम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com