मुळशीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या उपाययोजना करा... 

धोंडिबा कुंभार
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

मुळशी तालुक्‍यात चांदणी चौक ते पौड या दरम्यान भूगाव, पिरंगुट, घोटावडे फाटा आणि पौड आदी प्रमुख चार ठिकाणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीए, रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत आणि पोलिस खात्याने समन्वय साधून गांभीर्याने लक्ष घालायला पाहिजे. त्यासाठी स्थानिकांचेही सहकार्य घेऊन त्यावर उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. 

पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्‍यात चांदणी चौक ते पौड या दरम्यान भूगाव, पिरंगुट, घोटावडे फाटा आणि पौड आदी प्रमुख चार ठिकाणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीए, रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत आणि पोलिस खात्याने समन्वय साधून गांभीर्याने लक्ष घालायला पाहिजे. त्यासाठी स्थानिकांचेही सहकार्य घेऊन त्यावर उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. 

मुळशी तालुक्‍यातून कोकणात जाणाऱ्या कोलाड महामार्गावर वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करताना पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्ते महामंडळाच्या प्रतिनिधींनी एकत्रित येऊन रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला गती देणे अत्यावश्‍यक आहे. चौक सुधारणा प्रकल्पांतर्गत भूगाव, लवळे फाटा, पिरंगुट, घोटावडे फाटा आणि पौड येथे उड्डाणपूल व भूयारीमार्ग करणे, वाहतूक नियंत्रक दिवे बसविणे, वाहतूक नियमन करणारे वॉर्डन नेमावे. आणि भूगाव व पौडला बाह्यवळण काढणे गरजेचे ठरणार आहे. 

माताळवाडी, भूगाव गावठाण, सिद्धी लॉन्सलगतचा उपरस्ता, दौलत पेट्रोल पंपालगतचा रस्ता, भागवत फार्म (बावधनकडे जाणारा उपरस्ता), लवळे फाटा, पिरंगुट हायस्कूलला जाणारा उपरस्ता, पिरंगुट कॅंपवरून गावात जाणारा मुख्य रस्ता, सनशाईन सोसायटीमध्ये जाणारा रस्ता, घोटावडे फाटा आदी प्रमुख ठिकाणी वाहतुकीच्या गर्दीवेळी वॉर्डन नेमले पाहिजेत.

घोटावडे फाटा येथील वाहतूक नियंत्रक दिवे (सिग्नल) सुरू करावेत. एसटी अथवा पीएमपीच्या बसथांब्यालगत खासगी प्रवासी वाहतूक करणारे वडाप, जीप, रिक्षा यांना थांबण्यास मनाई करून त्यांना अन्य जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. ग्रामपंचायतींनी सम- विषम तारखांना पार्किंगचे नियोजन प्रभावी राबवावे. "लवासा'ची वाहतूक मुकाईवाडीमार्गे वळविली; तरी मुख्य रस्त्यावरील ताण बराचसा कमी होईल. 

ग्रामपंचायतींनी रस्त्यावरील अतिक्रमणे काढावीत. भाजीवाले व अन्य किरकोळ विक्रेते यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देऊन रस्ता कायमस्वरूपी मोकळा करावा. चांदणी चौक ते भुकूम या दरम्यान असलेल्या मंगल कार्यालयाच्या मालकांची बैठक घेऊन लग्नाच्या अथवा अन्य समारंभाच्या दिवशी वाहतूक नियमनासाठी सुरक्षारक्षक, स्वयंसेवक व वाहतूक नियंत्रक नेमावेत. मटण, मासे व दारूच्या दुकानांसमोर सर्वांत मोठी गर्दी होऊन वाहतूक ठप्प होते. त्यावर पर्याय म्हणून त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली; तर बरीचशी कोंडी कमी होईल.

वाहतूक नियमनासाठी ग्रामपंचायतीने स्वयंसेवक नेमून रस्त्यात दुचाकी व चारचाकी वाहने उभी करून भाजी अथवा अन्य वस्तू खरेदी करणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करणे अत्यावश्‍यक आहे. सध्या प्रगतिपथावर असलेल्या कामांची आगावू सूचना देणारे फलक जागोजागी लावावेत. जेणेकरून वाहनचालक पर्यायी रस्ता शोधतील. या सगळ्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. 

या उपाययोजना गरजेच्या 
- वाहतूक नियमनासाठी ठिकठिकाणी वॉर्डन नेमा 
- रस्त्याकडेची अतिक्रमणे हटवा 
- महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतूक नियंत्रण दिवे बसवा 
- बाह्यवळण व पर्यायी रस्त्यांची निर्मिती करा. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take these steps to relieve traffic congestion in Mulshi taluka