तळेगाव-चाकण महामार्गावर तब्बल सहा तास कोंडी

गणेश बोरुडे
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

तळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण महामार्गासाठी शुक्रवारची सकाळ प्रचंड कोंडीची ठरली. बंद पडलेले दोन कंटेनर आणि अपघातामुळे पहाटे चार ते सकाळी दहा वाजेपर्यंत एच.पी चौक ते वडगाव फाटयापर्यत वाहतुकीची कोंडी झाली होती.

तळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण महामार्गासाठी शुक्रवारची सकाळ प्रचंड कोंडीची ठरली. बंद पडलेले दोन कंटेनर आणि अपघातामुळे पहाटे चार ते सकाळी दहा वाजेपर्यंत एच.पी चौक ते वडगाव फाटयापर्यत वाहतुकीची कोंडी झाली होती.

पहाटे तिनच्या दरम्यान एक अवजड कार कंटेनर सुदवडी टोलनाक्याजवळ रस्त्यावरच बंद पडल्याने वाहतूक कोंडीला सुरुवात झाली. त्यानंतर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भंडारा डोंगर पायथ्याजवळ झालेल्या दोन कंटेनरच्या झालेल्या अपघातामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली. अपघातग्रस्त कंटेनर क्रेनने बाजूला काढणे सुरु असताना, आणखी एक ट्रक मधेच बंद पडला. यामुळे कोंडी वाढत जाऊन ,बेशिस्त वाहनचालकांनी उलट्या बाजूने वाहने घुसवल्याने चाकण बाजूला एमआयडीसी एचपी चौकापर्यत तर तळेगावच्या बाजूला मुंबई महामार्गापर्यंत लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

या कोंडीत बसेस आणि मालवाहू वाहने अडकली. कोंडीमुळे तळेगाव आणि चाकण दोन्ही औद्योगिक वसाहतीमधील बर्याच कंपन्यांचा माल आणि कामगारांना पोहोचण्यास जवळपास दोन तास उशीर होऊन नियोजनावर परिणाम झाला. कोंडीमुळे तळेगावातील विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास उशीर झाला. एमआयडीसी आणि चाकण पोलिसांनी स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या सहाय्याने नऊ वाजेपर्यत वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर पुन्हा खालुंब्रे चढावर कंटेनर आडवा झाल्याने पुन्हा तासभर वाहतूक कोंडी झाली होती. वारंवार होत असलेल्या अपघात आणि कोंडीमुळे उदयोगजगत आणि जनजीवन विस्ककळीत होत असल्यामुळे तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामास गती देण्याची मागणी आहे.

Web Title: Talegaon-Chakan highway on the highway for six hours