तळेगाव-चाकण महामार्गावर कोंडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

तळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण महामार्गासाठी शुक्रवारची (ता. ३) सकाळ कोंडींची ठरली. बंद पडलेले दोन कंटेनर आणि अपघातामुळे पहाटे चार ते सकाळी दहा वाजेपर्यंत एचपी चौक ते वडगाव फाट्यापर्यंत कोंडी झाली होती.

तळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण महामार्गासाठी शुक्रवारची (ता. ३) सकाळ कोंडींची ठरली. बंद पडलेले दोन कंटेनर आणि अपघातामुळे पहाटे चार ते सकाळी दहा वाजेपर्यंत एचपी चौक ते वडगाव फाट्यापर्यंत कोंडी झाली होती.

शुक्रवारी पहाटे तीनच्या दरम्यान एक अवजड कंटेनर सुदवडी टोल नाक्‍याजवळ रस्त्यातच बंद पडल्याने वाहतूक कोंडीला सुरवात झाली. त्यानंतर एक तासाने भंडारा डोंगर पायथ्याजवळ झालेल्या दोन कंटेनरच्या अपघातामुळे दोन्ही बाजूंकडील वाहतूक ठप्प झाली. अपघातग्रस्त कंटेनर क्रेनने बाजूला काढताना, आणखी एक ट्रक मध्येच बंद पडला. यामुळे कोंडी वाढत जाऊन बेशिस्त वाहनचालकांनी उलट्या बाजूने वाहने घुसविल्याने चाकण बाजूला एचपी चौकापर्यंत, तर तळेगावच्या बाजूला मुंबई महामार्गापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे तळेगाव आणि चाकण दोन्ही औद्योगिक वसाहतींमधील बऱ्याच कंपन्यांचा माल आणि कामगारांना पोचण्यास जवळपास दोन तास उशीर होऊन नियोजनावर परिणाम झाला. 

कोंडीमुळे तळेगावातील विद्यार्थ्यांना शाळेत पोचण्यास उशीर झाला. एमआयडीसी आणि चाकण पोलिसांनी स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या साह्याने नऊ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर खालुंब्रे चढावर कंटेनर आडवा झाल्याने पुन्हा तासभर वाहतूक कोंडी झाली. वारंवार होत असलेल्या अपघात आणि कोंडीमुळे तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामास गती देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Talegaon-Chakan highway traffic