श्‍वान तर नाहीच पैसे मात्र बुडाले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

तळेगाव दाभाडे - मित्राचा वाढदिवस साजरा करण्याबरोबरच आठ ते दहा मित्रांनी श्‍वान पाळण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मोबाईलवरून त्यांनी शोध सुरू केला. पण, तो त्यांच्याच अंगलट आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे श्‍वानही नाही आणि पैसेही गेले, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली. 

श्‍वान खरेदीसाठी त्यांनी पैसे जमविले. त्यासाठी मोबाईलवरून विविध साईटवर शोध सुरू केला. एका बहाद्दराने त्यांना मोबाईलद्वारे पैसे भरावयास सांगितले. श्‍वान न देताच तब्बल १९ हजारांना गंडा घालून फसवणूक केली.

याबाबतची फिर्याद रिशब राजेश आगरवाल (वय- १९, रा. फ्लोरा-सिटी, तळेगाव दाभाडे) या विद्यार्थ्याने तळेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. आता पोलिस गंडा घालणाऱ्याचा शोध घेत आहेत. हे सर्व मित्र पुण्यामधील एकाच महाविद्यालयात शिकतात. एकत्र राहत असताना त्यांची मैत्री जमली. बहुतेक सर्वांनाच श्‍वान पाळण्याची खूपच हौस आहे. मित्राच्या वाढदिवसाला श्‍वानच भेट देण्याचे त्यांनी ठरविले. महाविद्यालयाजवळील वसतिगृहाच्या खोलीवर श्‍वान ठेवण्याचा निर्णय घेतला. मोबाईलवरून संकेतस्थळावर शोध घेण्यास सुरवात झाली. समोरून प्रतिसाद मिळताच त्यांना आनंदाचे भरते आले. विशेष म्हणजे बंगळूर येथून मोबाईलद्वारे एकाने त्यासाठी संपर्क साधला. सावज हेरले आणि श्‍वानाची छायाचित्रासह माहिती पाठविली. घासाघीस करून सात हजार रुपये किंमतही ठरली आणि सिकिरू वाकीलत तीतीलोपे याच्या बंगळूर येथील युनियन बॅंकेच्या खात्यावर सोळाशे रुपये पाठवून रीतसर श्‍वानाची मित्रांनी नोंदणी केली. त्यानंतर ठरल्यानुसार सात हजार रुपयेही पाठविले. कुरिअरने श्‍वान पाठवीत असल्याचे कळविले. मात्र, त्यासाठी पिंजरा हवा असून १२ हजार रुपये अनामत भरावे लागतील, असे कळविले. श्‍वान दिल्यावर पिंजरा परत घेऊन जाताना अनामत रक्कम परत दिली जाईल, असेही सांगितले. तेही पैसे पाठविण्यात आले. श्‍वान केव्हा येतो, याची सर्वजण वाट पाहू लागले. मात्र, त्यानंतर पुन्हा श्‍वानाचा विमा काढायचा आहे, त्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. आता हद्द झाल्याने फसवणूक झाल्याचे मित्रांच्या लक्षात आले. पैसे देऊनही श्‍वान मिळाला नाही. जमविलेले पैसेही गेले आणि श्‍वान पाळण्याची हौसही तशीच राहिल्याने त्यांचा हिरमोड झाला. याबाबत त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली असून, पोलिस फसवविणाऱ्याचा शोध घेत आहेत.

Web Title: talegaon dabhade crime Fraud case