#MarathaKrantiMorcha तळेगाव, देहूरोड, पवन मावळात बाजारपेठा बंद

#MarathaKrantiMorcha  तळेगाव, देहूरोड, पवन मावळात बाजारपेठा बंद

तळेगाव स्टेशन - मावळ बंदला तळेगाव शहरासह एमआयडीसी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहर परिसरातून जाणाऱ्या दोन्ही महामार्गांवर तुरळक वाहने वगळता शुकशुकाट होता.

शहरातील बहुतांशी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. मोटारसायकल रॅली काढून ‘बंद’चे तरुणांनी आवाहन केले. रॅलीतील युवकांनी दुपारी तळेगाव-चाकण महामार्गावर ठिय्या मांडल्याने वाहतूक कोंडी झाली. भरलेल्या शाळा मधूनच सोडून देण्यात आल्या. अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि व्यवहार बंद होते. स्टेशनची भाजी मंडई पूर्णपणे बंद होती. मावळ तालुका स्टोन क्रशर संघटनेने ‘बंद’ला पाठिंबा दिला. रिक्षाचालकांनीही वाहने बंद ठेवली. 

एमआयडीसी परिसरात बंदच्या आवाहनाला अनुसरून बहुतांशी कंपन्यांनी उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारीच घेतला होता. तरीही उत्पादन सुरू असलेल्या काही कंपन्यांच्या गेटवर जाऊन दुपारी बाराच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आवाहन केल्यानंतर कामगारांसह कर्मचाऱ्यांनी उत्पादन बंद करण्यात आले. मात्र कामगार बसचालकांनी येण्यास नकार दिल्याने बराच काळ ताटकळत बसावे लागले. वराळे फाट्यावर टायर जाळून एमआयडीसीकडे जाणारी वाहतूक रोखून धरली होती. कडकडीत बंदमुळे दुपारनंतर पूर्णपणे शुकशुकाट झाला. तळेगाव एसटी आगारातून लांब पल्ल्याच्या काही वगळता, स्थानिक आणि तालुक्‍यातील सर्व फेऱ्या बंद होत्या. पुण्याकडून मुंबईकडे एकही बस गेली नाही.

देहूरोडमध्ये मोर्चा 
देहू - देहूरोड शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने देहूरोड ‘बंद’ला व्यापारी आणि विविध संघटनांनी पाठिंबा दिला. भाजी मंडई, सराफ बाजार, कपड्याची बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. शहरात मोर्चा काढण्यात आला. सकाळी दहा वाजता सुभाष चौकात कार्यकर्ते जमा झाले. काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रवीण झेंडे, रघुवीर शेलार, रमेश जाधव, धनू मोरे, दत्तात्रेय तरस, संदेश भेगडे, अमित भेगडे, अतुल शेलार, रेणू रेड्डी, गुरुमितसिंग रत्तू, अंजनी बत्तल, राजेश शेलार, बबनराव पाटोळे, विलास शिंदे, राजाभाऊ मराठे, महेश धुमाळ व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. निगडी येथे देहूरोडकडे येणारी वाहने महामार्गावर अडविण्यात आल्यामुळे देहू, देहूरोड, चिंचोलीकडे येणाऱ्या नागरिक, कामगार, विद्यार्थ्यांचे हाल झाले.

आंदर मावळात शुकशुकाट
टाकवे बुद्रुक : ‘बंद’ला आंदर मावळात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते. शाळा, महाविद्यालये बंद होती. 

कान्हे फाटा, जांभूळगाव फाटा, ब्राह्मणवाडी येथे कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला. टाकवे, वडेश्वरसह बहुतांश सर्व गावांत व्यवहार बंद होते. औद्योगिक वसाहतीतील कारखाने बंद होते. शाळेत विद्याथी आले नाही. खासगी प्रवासी वाहतूक बंद होती. आंबी वराळे फाटा येथे झालेल्या आंदोलनात काकासाहेब शिंदे आणि शशिकांत सोनवणे यांना श्रद्धांजली वाहून तरुणांनी टक्कल करून सरकारचा निषेध नोंदवला. तत्पूर्वी दुचाकी रॅली काढली.

पवन मावळात शाळा बंद
पवनानगर - पवनानगर  परिसरात मावळ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिसरातील बाजारपेठ तसेच बहुतांशी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आले होते. सकाळी नऊ वाजता ओंकार मंदिराजवळ  आंदोलक जमा झाले. रॅलीतील युवकांनी शाळेत जाऊन ‘बंद’चे आवाहन केले. त्यानंतर शाळा सोडून देण्यात आल्या. पवनानगर चौकात काकासाहेब शिंदे यांनी श्रद्धांजली वाहण्यात आली. अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि व्यवहार बंद होते. परिसरातील अनेक गावात ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कडधे येथील युवक व महिलांना पवनानगर कामशेत रस्त्यावर काही काळ रस्ता अडवला व टायर जाळून निषेध व्यक्त केला. अनेक गावांतील प्राथमिक शाळा सोडून देण्यात आल्या.

इंदोरीत सरकारचा निषेध
इंदोरी - इंदोरी व परिसरातील गावांमध्ये शांततेत बंद पाळून मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. इंदोरीत सर्वपक्षीय बैठक घेऊन एकमताने दुकाने बंद ठेवावीत व सहा आसनी रिक्षाचालकांनी प्रवासी वाहतूक करू नये, असे आवाहन करण्यात आले. काकासाहेब शिंदे या युवकास श्रद्धांजली अर्पण केली. दुकानदार व रिक्षाचालक यांनी ग्रामस्थांच्या आवाहनास प्रतिसाद दिला व कडकडीत बंद पाळण्यात आला. सुदुंबरे येथे मराठा युवकांनी गावातून शांतता फेरी काढून ‘बंद’चे आवाहन केले. सिद्धेश्‍वर मंदिरात फेरीचे रुपांतर सभेत झाले. सुदुंबरेत कडकडीत बंद पाळण्यात आला. शाळा, महाविद्यालयही बंद ठेवण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयासमोर जमा झालेले सकल मराठा बांधवाने संपूर्ण गावातून सरकार विरोधी निषेध फेरी काढली. काकासाहेब शिंदे यांना ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली.

उर्से परिसरात घोषणाबाजी
बेबडओहोळ - घोषणाबाजी करीत मराठा समाजाच्या तरुणांनी द्रुतगती महामार्गासह ऊर्से, बेबडओहोळ, परंदवडी, धामणेसह पंचक्रोशीत गावातून मोर्चा काढला. गावातील सर्व दुकाने, वाहने व शाळाही बंद ठेवल्या. ‘बंद’चा ऊर्से औद्योगिक व बेबडओहोळ औद्योगिक परिसरातील कंपनीवरही परिणाम झाला.

दिघीतही मोठा प्रतिसाद
भोसरी - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दिघीत गुरुवारी (ता. २६) कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली होती. दवाखाने आणि औषधांची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मराठा बांधवांनी दिघी परिसरात ठोक मोर्चा काढून आरक्षणाच्या मागणीबरोबरच सरकारचा निषेध केला. बंदमुळे दिघीतील रामचंद्र गायकवाड माध्यमिक विद्यालय, ग्यानबा सोपानराव मोझे विद्यालय, भारती विद्यालय, मंजिरीबाई विद्यालय, सेंट अँखोनी इंग्लिश मीडियम स्कूल, गॅलॅक्‍सी इंग्लिश मीडियम स्कूल, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेसह इतर शाळांनीही विद्यार्थ्यांना सुटी जाहीर केली होती. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन आळंदी रस्त्यावर रास्ता रोको करण्याचे टाळल्याने दिघीतील पुणे-आळंदी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होती.

काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली
मोशी - येथील गंधर्वनगरी, तापकीरनगर, खानदेशनगर आदी परिसरांतून काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राजा शिवछत्रपती चौकामध्ये मोर्चा काढला. चंद्रकांत तापकीर, गणेश आंबेकर, मच्छिंद्र गवारी, लाला पठारे, किरण शिंदे, कालिदास सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सकाळी दहा वाजता मोर्चास सुरवात झाली. काकासाहेब शिंदे यांचे छायाचित्र अग्रभागी ठेवून व्यर्थ न हो बलिदान, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आदी घोषणा देण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com