तळेगाव परिसराला रानफुलांचा साज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

तळेगाव स्टेशन - तळेगाव परिसरातील वनराईने सध्या वातावरण उल्हासपूर्ण बनले आहे. सणोत्सवांच्या आगमनाबरोबरच हिरवाईने नटलेल्या डोंगरटेकड्यांच्या कुशीत विसावलेले तळेगाव दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर रानफुलांचा साज चढताना आणखीणच अाल्हाददायक भासत आहे.

तळेगाव नगरपालिका हद्दीत प्रथमच होत असलेल्या वृक्षगणनेनुसार निम्म्या भागातील झाडांची संख्या दीड लाखापर्यंत भरली आहे. त्यावरून झाडांची संख्या तीन लाखांच्या आसपास असेल, असा अंदाज आहे.
- विशाल मिंड, वृक्षाधिकारी, तळेगाव दाभाडे नगरपालिका

लोणावळ्यापेक्षा तळेगावची उंची समुद्रसपाटीपासूनची अधिक आहे. चौराई डोंगर, उर्से खिंडीचा डोंगर, हरणेश्वर टेकडीवरून येणारी हवा तळेगावकरांसाठी आरोग्यदायी ठरते. सरदार खंडेराव दाभाडे यांनी १८६० मध्ये तळेगाव परिसरात लावलेली ही वृक्षराजी नंतर भाऊसाहेब सरदेसाई रुग्णालयाच्या अस्थमा रुग्णांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरली. साधारणतः दीडशे पावणेदोनशे वर्षे आयुष्य असलेल्या स्टेशन ते जिजामाता चौक मार्गावरील झाडांची नैसर्गिक कमान म्हणजे तळेगावचे हेरिटेजच म्हणावे लागेल. वृक्षप्रेमींमुळे कत्तलीपासून वाचलेल्या ९७ झाडांची ही कमान लाल फुलांच्या कोंदणात लोभस बनली आहे. जनरल हॉस्पिटल, उद्योगधाम, बनेश्वर परिसरांतील दाट झाडी लक्ष वेधून घेते. जांभूळ, आंबा, चिकू, फणस, बदाम, डाळिंब, नारळ, गावरान चिंच, विलायती चिंच या फळझाडांबरोबरच वड, पिंपळ, उंबर, बेहडा, साग, आपटा, खैर, कडुनिंब, अर्जुन आदी आयुर्वेदिक औषधी झाडेही परिसरात दिमाखाने डोलत आहेत. शिवण, बहावा, पेल्टोफार्म, भेंडी, पापडी, मोह, सप्तपर्णी, रेन-ट्री, फायकस, बाभूळ, महाडूक, करंज, अर्जुन, सांदडा आदींसह विविध जातींची झाडे सार्वजनिक तसेच वैयक्तिक पातळीवरही संगोपित केले जात आहेत. ‘ताम्हण’ हा राज्यवृक्षही येथे आहे. त्यामुळे तळेगाव पक्ष्यांचे आश्रयस्थान बनले असून, सकाळ-संध्याकाळी येथे किलबिलाट असतो. यशवंतनगरमधील रोपवाटिकेत वड, ताम्हण, पिंपळ, करंज, कडुनिंब आदी उपयुक्त झाडांची रोपे तयार करून वैयक्तिक आणि सार्वजनिक रोपणासाठी दिली जातात. तळेगाव नगरपालिका उद्यान विभागामार्फत प्रगतिपथावर असलेल्या वृक्षगणनेनुसार अंदाजे तीन लाखांपेक्षा जास्त झाडे तळेगाव नगरपालिका हद्दीत असल्याचा दावा पालिकेतर्फे केला जातो. सध्या रानझेंडू आणि इतर छोट्या फुलांनी आसपासच्या टेकड्या फुलू लागल्या आहेत.

Web Title: Talegaon furnishings grass of the field area