तळवडे-खराडी आयटी जोडणार

पीतांबर लोहार
सोमवार, 7 जानेवारी 2019

पिंपरी - चऱ्होली ते लोहगाव जोडणारा रस्ता आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) प्रस्तावित रिंग रोड यामुळे शहरातील तळवडे आयटी पार्क आणि पुण्यातील खराडी आयटी पार्क जोडले जाणार आहेत. त्यामुळे या पट्ट्यात येणाऱ्या गावांचा झपाट्याने विकास होण्यास मदत होणार आहे. 

पिंपरी - चऱ्होली ते लोहगाव जोडणारा रस्ता आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) प्रस्तावित रिंग रोड यामुळे शहरातील तळवडे आयटी पार्क आणि पुण्यातील खराडी आयटी पार्क जोडले जाणार आहेत. त्यामुळे या पट्ट्यात येणाऱ्या गावांचा झपाट्याने विकास होण्यास मदत होणार आहे. 

देहू-आळंदी रस्त्यालगत तळवडे येथे आयटी पार्क आहे. हा रस्ता चारपदरी झालेला आहे. आळंदीपासून चऱ्होलीपर्यंत आणि चऱ्होली ते लोहगाव जोडणाऱ्या रस्त्याचे कामही प्रगतिपथावर आहे. लोहगाव ते खराडी आयटी क्षेत्रापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. त्यामुळे तळवडे आणि खराडी आयटी क्षेत्र एकमेकाला जोडले जाणार आहे, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. सध्या स्मार्ट सिटीच्या तत्त्वानुसार चऱ्होली फाटा ते चऱ्होली गावठाण रस्त्याची उभारणी सुरू आहे. पदपथ, सायकल ट्रॅक यांसह विविध सेवावाहिन्यांसाठी भूमिगत नलिका टाकण्यात येत आहेत. त्यांना ठिकठिकाणी ‘डक’ ठेवण्यात येणार आहेत. याच पद्धतीने चऱ्होलीगाव ते लोहगाव जोडणाऱ्या रस्त्याचीही उभारणी केली जात आहे. 

रिंगरोडचाही फायदा
पुणे व पिंपरी-चिंचवडच्या बाहेरून पीएमआरडीएने रिंगरोड प्रस्तावित केला आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. चाकण, आळंदी, मरकळ, वाघोली परिसरातून रिंगरोड जाणार असल्याने त्याचा फायदा तळवडे-खराडी आयटी क्षेत्र जोडणाऱ्या रस्त्यालाही होणार आहे. तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, आळंदी, चऱ्होली आदी गावे सध्याच्या रस्त्यांमुळे तर वडगाव शिंदेमार्गे लोहगाव रिंगरोडशी जोडले जाणार आहे. त्यामुळे या सर्व गावांच्या विकासाला हातभार लागणार आहे.

तळवडे आणि पुण्यातील खराडी आयटी क्षेत्र एकमेकाला जोडण्याचे नियोजन आहे. या दोन्ही आयटी क्षेत्राला जोडण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रस्त्यामुळे गावांचा विकास झपाट्याने होणार आहे. मोशी, चऱ्होली, लोहगाव, वडगाव शिंदे आदी भागांचा यात समावेश आहे. 
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका

Web Title: Talegaon Kharadi IT Connected