तळेगाव पोलिसांकडून अडीच लाखांची दारु जप्त

गणेश बोरुडे
मंगळवार, 17 जुलै 2018

तपासणी दरम्यान गाडीमध्ये विविध विदेशी ब्रँड आणि देशी बनावटीच्या मद्याने भरलेल्या जवळपास २ हजार बाटल्या आढळून आल्या.

तळेगाव स्टेशन : विनापरवाना अवैधरित्या वाहतूक होणारी अडीच लाखांची दारु आणि स्कॉर्पिओ गाडीसह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त करत तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोन आरोपींना सोमवारी सायंकाळी (ता. १६) अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. १६) सायंकाळी तळेगाव दाभाडे हद्दीत,चाकण महामार्गावर, स्वराज नगरीसमोर जाणारी महिंद्रा स्कॉर्पिओ क्रमांक एमएच-०४ डीबी-७४४२ ची पोलिस उपनिरीक्षक शशिकांत भोसले, वैभव सोनवणे, युवराज वाघमारे, नितीन गार्डी, महेश दौंडकर यांच्या पोलिस पथकाने तपासणी केली.

तपासणी दरम्यान गाडीमध्ये विविध विदेशी ब्रँड आणि देशी बनावटीच्या मद्याने भरलेल्या जवळपास २ हजार बाटल्या आढळून आल्या. कुठलाही परवाना नसताना अवैधरित्या मद्य वाहतूक करीत असलयाचे आढळल्याने पोलिसांनी २ लाख ५६ हजार ५३ रुपयांची दारु आणि ५ लाख रुपयांच्या स्कॉर्पिओ गाडीसह एकूण ७ लाख ५६ हजार ५३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोन जणांना अटक केली. राहुल प्रमोद शर्मा (२५, कुसगाव, मावळ, पुणे) आणि बालमुकुंद कमलेश चौरसिया (२१, सालीहा, हुनेद, जि. पन्ना, मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.दोघांविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी करीत आहेत.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Talegaon police seized two and half lakh liquor