सह्यकड्यांवर फुलोत्सव

गणेश बोरुडे 
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

तळेगाव स्टेशन - पावसाळ्यानंतर हिरवाईने नटलेल्या पश्‍चिम घाटाच्या सह्यकड्यांवर आणि आजूबाजूला डोंगर टेकड्यांवर फुललेल्या रंगीबेरंगी रानफुलांनी, गणरायाला निरोप देताना हळव्या झालेल्या मनावर चैतन्य पेरले आहे. नवरात्रीच्या नांदीला जिकडे तिकडे चोहीकडे फुललेल्या रानफुलांमुळे सह्यकड्यांवर जणू फुलोत्सव सुरू झाल्याचे चित्र आहे.

तळेगाव स्टेशन - पावसाळ्यानंतर हिरवाईने नटलेल्या पश्‍चिम घाटाच्या सह्यकड्यांवर आणि आजूबाजूला डोंगर टेकड्यांवर फुललेल्या रंगीबेरंगी रानफुलांनी, गणरायाला निरोप देताना हळव्या झालेल्या मनावर चैतन्य पेरले आहे. नवरात्रीच्या नांदीला जिकडे तिकडे चोहीकडे फुललेल्या रानफुलांमुळे सह्यकड्यांवर जणू फुलोत्सव सुरू झाल्याचे चित्र आहे.

अलीकडच्या काळात मावळात झपाट्याने फैलावणाऱ्या सिमेंटच्या जंगलामुळे निसर्ग नवलाईला ग्रहण लागले असले तरी, पावसाळ्यानंतर मावळात बहरणारी हिरवळ आणि रानफुले निसर्गप्रेमींना नवी उभारी देऊन जातात. भाद्रपद ते कार्तिक असा साधारणतः तीन महिन्यांचा कालावधी म्हणजे रानफुलांच्या बहराचा उत्सव. सह्यकड्यांवर फुलोत्सव पाहण्यासाठी कुणाच्या निमंत्रणाचीही गरज नसते. दवबिंदूंची दुलई पांघरलेल्या हिरवाईमधून वाट काढत जाणारे मावळातील रस्ते आणि त्यांच्यावर शिंपडलेली रानफुले सध्या मनाला भुरळ घालत आहेत. 

साधारणतः घटस्थापनेच्या अगोदर आठवडाभर जागोजागी दिसणाऱ्या रानफुलांच्या कळ्या कधी फुलाचे रुपडे घेऊन हिरव्यागार रानावनाला कोंदण घालतात, हे कळत नाही. रंग, रूप, गंध, आकार, रचना आदींबाबत विविधता असलेल्या प्रत्येक फुलाचे स्वतःचे वेगळेच वैशिष्ट्ये. हालचालीसुद्धा अगदी नाना तऱ्हेच्या. घाणेरीसारखी काही झुबक्‍यांच्या झुंडीत एकमेकांना बिलगलेली; तर काही एकटी असूनही वाऱ्यासोबत तोऱ्यात डोलणारी. सोनकुसुम, रानझेंडू, कुर्डू अर्थात कोंबडा, सोनकी, रानहळद, तेरडा, दशमुळी, विविध रंगछटांची घाणेरी, शंकासूर, कारवी, विष्णुकांता, आरटी, सोनतराड आणि आणखी खूप डोळ्यांना सुखावणारी. दुरूनच लक्ष वेधून घेणारी ही फुले दोन- तीन आठवडे रंगाची मुक्त उधळण करीत असतात. जणू काही दिवाळीपूर्वीचा फुलोत्सव. आसमंतात सगळीकडे दरवळणारा मनमोहक सुगंध. भल्या सकाळी डोंगर टेकड्यांवरची मंद धुक्‍याची किनार आणि त्याखाली रानफुलांनी कुंपण घातलेले हमरस्ते, लोहमार्ग, पायवाटा, डोंगरदऱ्या, नदीकिनारे, कडे-कपारी, कातळातही फुलून आलेली रानफुले कोवळ्या उन्हात न्हाऊन निघताना मन उल्हसित करून ठाकतात. रानफुलांची ही मांदियाळी म्हणजे निसर्गाचा अद्‌भुत नजराणाच होय. तो पाहताना मनावरचा ताणतणाव दूर झाल्याशिवाय राहात नाही.

Web Title: talegaon statin news flower