लेन कटिंगला वेसण घालणार कोण?

Express Highway
Express Highway

तळेगाव स्टेशन - पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना पुणे-मुंबई महामार्ग यावरून जाणारे वाहनचालक नियमांचे उल्लंघन करतात. पुढे जाण्यासाठी सर्रासपणे लेन कटिंग केली जाते. त्यावर पोलिसांकडून होणारी कारवाई तुटपुंजी असल्याने अपघातांत भर पडत आहे.

महामार्गावर वाहन चालवताना रस्त्याच्या डाव्या बाजूने अवजड वाहने, मधल्या लेनमधून हलकी चारचाकी वाहने आणि सर्वांत उजवीकडील लेन फक्त ओव्हरटेकिंगसाठी वापरण्याचे संकेत असतानाही महामार्ग व द्रुतगती मार्गावर अवजड वाहने उजव्या बाजूने अर्थात दुभाजकाला खेटून चालवली जातात. 

महामार्गावर अवजड आणि धीम्या गतीची वाहने डाव्या बाजूनेच चालविणे, चुकीच्या पद्धतीने लेन कटिंग न करणे याबाबत वाहनचालकांचे अधूनमधून प्रबोधन करूनही सवयी मोडल्या जात नाहीत. परिणामी लेन कटिंगमुळे होणाऱ्या अपघातांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रस्ते विकास महामंडळाकडून राबविल्या जाणाऱ्या उपाययोजनांत सातत्य नसल्याने त्यांच्या मोहिमा निष्प्रभ ठरत आहेत. द्रुतगतीवर गेल्या वर्षी केलेला हाइट बॅरियर्सचा प्रयोग अपयशी ठरला. शनिवार राबविल्या जाणाऱ्या गोल्डन अवर्सचाही बोऱ्या वाजला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुख्य त्रुटी, लेन कटिंगवर कारवाई करण्यासाठी असलेला  साधन सामग्री आणि सुविधांचा अभाव आणि चालकांची अरेरावी पोलिसांच्या कारवाईला आडकाठी आणत आहे. वाहतूक नियमांबाबत पोलिसांची अनभिज्ञता आणि लेन कटिंगचा नाममात्र दंड यामुळे वाहनचालक जुमानत नाहीत.

नोव्हेंबरमध्ये द्रुतगती मार्गावर लेन कटिंग व ओव्हर स्पीडच्या कारवाईसाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या दोन वाहतूक पोलिसांना एका महिला वाहनचालकाने उडवून जखमी केले होते. कारवाईबाबत पोलिसही हतबल ठरत असल्याने नागरिकांनीच जागरूक होऊन स्वतःसह बेशिस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्याची मोहीम हाती घेतली पाहिजे. रस्त्यावर कुठेही असे उजव्या बाजूने चालणारे बेशिस्त चालक दिसल्यास त्यांना थांबवून समज देणे; अथवा प्रसंगी तंबी देणे एवढी तसदी प्रत्येकाने घेतली तरी भविष्यात लेन कटिंगमुळे होणारे अपघात कमी होण्यास निश्‍चितच मदत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com