लोकल प्रवासी वेठीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

रेल्वेच्या या गलथानपणाला वैतागलो आहोत. रोजच उशिरा धावणाऱ्या गाड्यांमुळे कार्यालयात लेटमार्क लागणे ही नित्याची बाब झाली आहे. सतत कार्यालयात उशिरा पोचण्याचे प्रमाण वाढल्याने अर्ध्या दिवसाची रजा कापली जाते, यामुळे नुकसान होते. रेल्वे प्रशासन आम्हाला हे नुकसान भरून देणार आहे का? उद्या सातत्याने उशिरा येण्याचे कारण दाखवून एखाद्याला कामावरून कमी केले तर रेल्वे त्या व्यक्तीस रेल्वेच्या नोकरीत सामावून घेणार का?
- प्रसाद लोणकर, प्रवासी, तळेगाव दाभाडे

तळेगाव स्टेशन - एक्‍स्प्रेस गाड्यांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी थांबवून ठेवल्यामुळे, तब्बल अर्धा तास उशिराने तळेगाव स्टेशनला पोचलेल्या लोणावळा- पुणे लोकलच्या प्रतीक्षेत थांबलेल्या प्रवाशांचा संताप अनावर झाला. संतप्त प्रवाशांनी जवळपास अर्धा तास रेल रोको करीत तळेगाव रेल्वे स्टेशन मास्तरांना घेराव घातला.

पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर नेहमीच जलदगती गाड्यांना प्राधान्य दिले जाते. त्यासाठी लोकल अनेकदा स्थानकावर अथवा मधेच काही काळ थांववून ठेवल्या जातात. त्यामुळे घाईत असलेल्या चाकरमानी, नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांचा खोळंबा होतो. कामावर पोचायला उशीर झाल्यास कधीकधी गैरहजेरी लागते. गेल्या आठवडाभरापासून लोकल गाड्यांचे वेळापत्रक आणखीच कोलमडले आहे.

बुधवारी (ता.३१) सकाळी ८.४८ ची लोणावळा-पुणे लोकल पंधरा मिनिटांनी उशिरा येणार असल्याची उद्‌घोषणा तळेगाव रेल्वे स्थानकावर करण्यात आली. त्यानंतर ही लोकल कशीबशी सव्वानऊला तळेगाव रेल्वे स्टेशनला पोचली. उशिरा आलेली लोकल आणि प्रचंड गर्दीमुळे सामान्य प्रवाशी प्रथमवर्ग डब्यात घुसल्याने गोंधळ उडाला. प्रथम वर्ग डब्यातील प्रवाशी चिडले. त्यानंतरही दोन एक्‍स्प्रेस गाड्यांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी ही लोकल जवळपास अर्धा तास तिथेच थांबवून ठेवण्यात आली. यामुळे संताप अनावर झालेल्या प्रवाशांनी रेल्वेची चेन खेचून धरत रेल्वे रुळांवर ठिय्या मांडला. रेल्वे प्रवाशांच्या निषेधाच्या घोषणा देत ७० ते ८० प्रवाशी थेट अधिकाऱ्यांच्या दालनात घुसले. दालनात घुसून जोरजोरात टेबलावर ठोसे मारत स्टेशन मास्तरांना घेराव घातला. अचानक झाल्या प्रकाराने स्टेशन मास्तर आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांचा पुरता गोंधळ उडाला. स्टेशन मास्तर सुरेश मीना यांनी रेल्वे प्रबंधकांशी चर्चा करून येथून पुढे लोकल वेळापत्रक पाळण्याचे आश्वासन दिल्यानंतर संतप्त प्रवाशी काहीसे नरमले. प्रवाशांची समजूत काढल्यानंतर दहाच्या सुमारास लोकल पुण्याकडे रवाना झाली. संतप्त प्रवाशांचा रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न रेल्वे पोलिस संदीप तोडमल, अरुण गायकवाड आणि सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखून हाणून पाडला.

प्रवासी म्हणतात, अर्ध्या तासाला लोकल हवी
सकाळी ७.५८ची लोणावळा-पुणे, ८.४८ लोणावळा-पुणे आणि ९.५७ तळेगाव-पुणे या तीन गाड्यांना नोकरदारांची प्रचंड गर्दी असते. बारा डब्यांच्या या गाड्यांमध्ये प्रत्येकी रोज साधारणतः दोन हजार प्रवासी प्रवास करतात.

अपवाद वगळता सध्या पुणे-लोणावळा मार्गावर कोणतेही देखभालीचे काम चालू नाही. त्यामुळे सध्या तरी लोकलला उशीर होण्यामागे इतर एक्‍स्प्रेस गाड्यांना रस्ता मोकळा करून देणे आणि रेल्वे व्यवस्थापनाचा ढिसाळपणा कारणीभूत असल्याचे प्रवाशांचे मत आहे

काही प्रवासी मुद्दाम चेन ओढतात. त्यामुळे कधीकधी पाच ते सात मिनिटांचा उशीर होत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लोणावळ्याकडून तळेगाव स्टेशनला येणाऱ्या लोकल तिकडूनच प्रवाशांनी भरून येत असल्याने तळेगावात चढणाऱ्या बहुतांश प्रवाशांना जागाच मिळत नाही. त्यामुळे चेंगराचेंगरी, ओढाताण आणि कधीकधी अपघात ठरलेलाच.

लोकलला उशीर झाल्यास अथवा रद्द झाल्यास जवळपास तासाभराने दुसरी लोकल असल्याने एक तास उशीर झाल्यास बऱ्याच कामगारांना कार्यस्थळी पोचण्यास उशीर होऊन अर्ध्या दिवसाची हजेरी लावावी लागते. यात आर्थिक नुकसान होते.

तळेगावहून दर अर्ध्या तासाला पीएमपीएमएलची निगडीपर्यंत बससेवा असली तरी, तेथून पुढे पुण्याकडे जाण्यासाठी वेळेवर अथवा थेट बससेवा नाही. त्यामुळे पीएमपीएमएल बस लोकलला पर्याय ठरू शकत नाही.

प्रवासी वाढती संख्या आणि सकाळच्या तीन तासांत लोकलवर पडणारा ताण लक्षात घेता सकाळी आठ ते दहा दरम्यान दर अर्ध्या तासाला पुण्याकडे लोकल सोडावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: talegaon station news pune news local passenger