पर्यावरणपूरक सायकलला सुगीचे दिवस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

तळेगाव स्टेशन - पर्यावरणपूरक, आरोग्यवर्धक, इंधनबचत करणारा पर्याय म्हणून सायकलींना तळेगावासारख्या निमशहरी भागात पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. सामान्य विद्यार्थ्यांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सायकलची क्रेझ वाढत चालल्याने पर्यावरणपूरक सायकल मावळात सुसाट आहे.

तळेगाव स्टेशन - पर्यावरणपूरक, आरोग्यवर्धक, इंधनबचत करणारा पर्याय म्हणून सायकलींना तळेगावासारख्या निमशहरी भागात पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. सामान्य विद्यार्थ्यांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सायकलची क्रेझ वाढत चालल्याने पर्यावरणपूरक सायकल मावळात सुसाट आहे.

गरिबीचे लक्षण मानले गेलेल्या सायकलकडे सध्या श्रीमंतीचे प्रतीक म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. व्यायाम आणि इंधनबचतीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांपासून ते युवक, युवती, महिला आणि ज्येष्ठ मंडळीही सायकलची रपेट मारताना नजरेस पडतात. सायकल डे, सायकल मॅरेथॉन, सायकल वाटप, सायकल बॅंक आदी उपक्रमांची रेलचेल आणि नागरिकांचा सहभागही वाढत चालला आहे. सायकल क्षेत्रातही नवनवीन कल्पना आणि रचनांचे वारे वाहू लागले असून, रटाळ सांगाड्याचा लुक काळानुरूप बदलत आहे. जाड टायर, अगदी सडपातळ टायर, गियर, बॅटरी, डायनामो आणि तत्सम विविध सुविधायुक्त सायकली बाजारात दाखल झाल्या आहेत. काही मॉडेल्सची उपलब्धता कमी असल्याने सायकल खरेदीसाठीही प्रतीक्षा करण्याची वेळ ग्राहकांवर येत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. विक्रेत्यांबरोबरच सायकल रिपेअरिंग, पंक्‍चर व्यावसायिकांनाही धंद्यात तेजी जाणवत आहे. 

सुनील शंकरराव शेळके फाउंडेशनने गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने जवळपास सातशे सायकलींचे मावळातील विद्यार्थ्यांना दोन महिन्यांत टप्प्याटप्प्याने वाटप केले. तसेच रोटरॅक्‍ट क्‍लबच्या वतीने जुन्या सायकली दुरुस्ती करून पुन्हा वापरायला सुरवात केली आहे. रोटरी क्‍लब ऑफ तळेगाव सिटी गेल्या दोन वर्षांपासून सायकल डे आयोजित करीत असून, गेल्या वर्षभरात शंभर सायकलींचे वाटप करण्यात आल्याचे संस्थापक विलास काळोखे यांनी सांगितले.

गेल्या दोन वर्षांत महिन्याकाठी विकल्या जाणाऱ्या ३०-३५ छोट्या मोठ्या सायकलींची संख्या ७५ च्या वर गेली आहे. उलाढाल पाच लाखांवर गेली आहे. तीन ते पंचवीस हजारांपर्यंत किमतीपर्यंतच्या सायकली उपलब्ध आहेत.
- सुभाष करपे, सायकल व्यावसायिक, तळेगाव

दैनंदिन जीवनात चैतन्य भरण्याचे काम सायकलिंगमुळे होते. तळेगाव हे स्वच्छ सुंदर पर्यावरणासाठी प्रसिद्ध आहे. ते अबाधित ठेवण्यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस सायकल वापरून पुढच्या पिढीला प्रदूषणमुक्त हवा देण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यायला हवे.
- दीपक फल्ले, आंतरराष्ट्रीय सायकलपटू

सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांची चणचण लक्षात घेता पर्यावरणपूरक सायकल वापरवाढीसाठी तळेगाव नगरपालिका प्रशासन, जागेच्या उपलब्धतेनुसार सायकल पार्किंग लॉट आणि स्वतंत्र सायकल वे विकसित करू शकेल.
- वैभव आवारे, मुख्याधिकारी, तळेगाव नगरपालिका

Web Title: talegaon station pune news environment cycle