तळेगावातील नाट्यवेडे रंगभूमीपासून वंचित

गणेश बोरुडे
मंगळवार, 22 जानेवारी 2019

तळेगाव स्टेशन - मावळची सांस्कृतिक राजधानी आणि कलेचे माहेरघर असलेले तळेगाव दाभाडे शहर आजही राजकीय इच्छाशक्तीअभावी नाट्यगृहाच्या प्रतीक्षेत आहे. सात दशकांची परंपरा असलेल्या नाट्यचळवळीला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी येथे सुसज्ज नाट्यगृह उभारावे, अशी मागणी आता नाट्यरसिक आणि कलाकारांमधून जोर धरू लागली आहे. 

तळेगाव स्टेशन - मावळची सांस्कृतिक राजधानी आणि कलेचे माहेरघर असलेले तळेगाव दाभाडे शहर आजही राजकीय इच्छाशक्तीअभावी नाट्यगृहाच्या प्रतीक्षेत आहे. सात दशकांची परंपरा असलेल्या नाट्यचळवळीला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी येथे सुसज्ज नाट्यगृह उभारावे, अशी मागणी आता नाट्यरसिक आणि कलाकारांमधून जोर धरू लागली आहे. 

शहर विकासाचा कायमच चढता आलेख असलेले तळेगावमधील रसिक नाट्यकलेपासून वंचित राहिले आहेत. स्वातंत्र्यप्रातीनंतर तळेगावातील नाट्यचळवळीने १९५१ ‘खडाष्टक’ नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण केले. त्यापाठोपाठ १९५२ साली गो. नि. दांडेकरांनी स्वतः लिहिलेले ‘सागराशी झुंज’ हे नाटक तुटपुंजा साधन सामग्रीशी झुंज देतच उभे राहिले. मात्र, नाट्यगृहाअभावी सहा-सात दशकांची ही परंपरा येथेच खुंटली. १९५६मध्ये ‘हौशी नाट्य मंडळ’ चळवळीच्या वाटचालीत अनंत अडचणी आल्या. १९५९मध्ये डॉ. शंकर परांजपे यांनी आव्हान म्हणून ‘वेड्याचं घर उन्हात’ हे नाटक पुण्यातून सेट आणून उभे केले. पण, वादळी पावसात हे वेड्याचं घर पुरतं कोलमडले. मात्र, डॉ. परांजपेंनी चिखलात माखलेला, फाटलेला पुन्हा जुळवत उभे केलेले नाटक उत्तम रंगले.

‘हौशी नाट्य मंडळा’ला बळकट करून एप्रिल १९७७ मध्ये गो. नि. दांडेकरांनी नटवर्य नारायण भावे आणि सुप्रसिद्ध नट चित्तरंजन कोल्हटकर यांच्या 
उपस्थितीत दत्त मंदिरात ‘कलापिनी’ संस्था सुरू केली. कलामंडळ नावाने प्रेक्षक चळवळ सुरू झाली. १२००हून अधिक सभासद असलेली ही नाट्यचळवळ अधिक जोमाने वाटचाल करीत आहे. नाट्यनिर्मितीसह हजारो कलाकार घडविणारी तळेगावची नाट्यचळवळ केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर भारत आणि परदेशातही नावाजली गेली आहे. मात्र, जागतिक पातळीवर रंगभूमी गाजवणाऱ्या तळेगावच्या या नाट्यवेड्यांचं घर नाट्यगृहाविना अद्यापही उन्हातच आहे. 

नवीन समर्थ विद्यालयासमोरील आरक्षित (सर्व्हे क्र. ४४२- पी) सात हजार चारशे चौरस मीटरच्या भूखंडावर नाट्यगृहासाठी २०१४ मध्ये आराखडा, अर्थसंकल्पात तरतूदही झाली. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी त्याची अद्यापही निविदा काढली गेलेली नाही. 

मराठी नाट्य परिषदेचे संस्थापक सुरेश धोत्रे म्हणाले, ‘‘हॅलो ब्रदर’सारख्या नाटकाद्वारे राज्यस्तरावर रंगमंच गाजविणाऱ्या तळेगावातील उगवत्या नाट्य-संगीत कलाकारांना आपल्या कर्मभूमीत हक्काचे व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे.’

प्रस्तावित नाट्यगृहाच्या नवीन अर्थसंकल्पासाठी बंगळूरमधील एका खासगी स्थापत्य आस्थापनाकडे आराखडा देण्यात आला आहे. त्यांच्याकडून आराखडा व खर्चाचा अंदाज आल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
- वैभव आवारे, मुख्याधिकारी, नगरपालिका

Web Title: Talegaon Station Theater Issue