तीन पोलिस ठाण्यांचा दरारा

तीन पोलिस ठाण्यांचा दरारा

तळेगाव स्टेशन - नव्यानेच होऊ घातलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात मावळातील देहूरोड उपविभागीय कार्यालयांतर्गत तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी आणि देहूरोड पोलिस ठाण्यांचा समावेश केला जाणार आहे. तथापि या नव्या आयुक्तालयामुळे या तिन्ही पोलिस ठाण्यांत दरारा, वचक, सुसूत्रता निर्माण व्हावी, अशी अपेक्षा येथील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. 

तळेगाव एमआयडीसी आणि त्या बरोबरीने वाढत्या लोकवस्तीमुळे गुन्हेगारी घटनांचा ताण वाढला आहे. ही बाब लक्षात घेऊन तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यापासून २०१५ मध्ये तळेगाव एमआयडीसी या स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. स्वाभाविकच त्यातून तळेगाव दाभाडे ठाण्यावरील ताण कमी होऊन काहीशी सुसूत्रता आली. परंतु, नवीन एमआयडीसी पोलिस ठाणे कुचकामी ठरले. सार्वजनिक व्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांचा हवा तसा अंमल कायमस्वरूपी प्रस्थापित झाला नाही. गुन्हेगारी घटना झाल्यानंतरच्या सोपस्कारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी गरजेचे आहे. तळेगाव-चाकण रस्त्यावरील नित्याच्या वाहतूक कोंडीला आणि बेशिस्तीमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्याबाबतचा सूर अद्यापही पोलिसांना गवसलेला दिसत नाही. तळेगाव पोलिस ठाण्याला असलेला मनुष्यबळ, साधनसामग्रीचा अभावही नव्यानेच होऊ घातलेल्या आयुक्तालयात समाविष्ट झाल्यानंतर दूर होईल, अशी आशा तळेगावकरांसह पोलिसांनाही आहे. 

स्थापनेपासून पावणेतीन वर्षांत नऊ अधिकारी बदलले. मात्र, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कारभाराची घडी बसली नाही. कार्यक्षेत्रातील गुन्हेगारी नियंत्रणात नाही. तळेगाव-चाकण रस्ता पोलिसांच्या दुर्लक्षाने अवैध धंद्यांचा वाममार्ग बनला आहे. गेल्या काही महिन्यांपासून एमआयडीसी पोलिस ठाण्याचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांमार्फत चालू आहे. नवीन आयुक्तालयामुळे वाहतूक नियंत्रणासाठी मनुष्यबळाची कुमक वाढून कायमस्वरूपी अधिकारी मिळण्याची शक्‍यता बळावल्याने आंदरमावळासह उद्योजकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सुसूत्रता, वचक आणि कामकाज केंद्रीकरणासाठी उपविभागीय कार्यालय देहूरोडऐवजी तळेगावला हलविल्यास पोलिस प्रशासनाच्या दृष्टीने निश्‍चितच प्रभावशाली ठरणार यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com