तळेगावकरांना यंदा करातून दिलासा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

तळेगाव दाभाडे  - येथील नगर परिषदेचा २०१९-२० या वर्षासाठीचा २११ कोटी ४० लाख २८ हजार पाचशे रुपयांचा अर्थसंकल्प गुरुवारी मंजूर करण्यात आला. पंचवीस लाख ७० हजार ७८२ रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ सुचविण्यात आलेली नाही. आगामी काळात सुमारे दोनशे कोटी रुपयांची विकासकामे करण्याचा दावा सत्ताधारी भाजपने केला आहे.

अर्थसंकल्प सादरीकरणासाठी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचा ठराव जनसेवा विकास समितीचे नगरसेवक गणेश खांडगे यांनी मांडला. विरोधी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे नगरसेवक किशोर भेगडे यांनी बैठकीच्या भत्त्याचा आगामी वर्षभराचा निधी सैनिक रिलीफ फंडाला द्यावा, अशी सूचना केली.

सभेच्या सुरवातीला किशोर भेगडे यांनी अर्थसंकल्पाच्या विषय पत्रिकेवर आक्षेप घेतला व उपसूचना दिली. यामध्ये दराला मान्यता घेतलेली नसून, प्रशासन दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. कोणाच्या फायद्यासाठी चुकीचा पायंडा पाडू नये, असे सुचविले. यावर मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी हा कर व दरपत्रक मंजुरी हा अर्थसंकल्पाचाच भाग असल्याचे स्पष्ट केले. मात्र, हे अयोग्य असल्याचे सांगत विरोधकांनी सभागृह सोडले. 

त्यानंतर सुमारे दोन तास चर्चा करीत सदस्यांनी अर्थसंकल्पाला मंजुरी दिली.
मंजूर अर्थसंकल्पात अर्थसंकल्प मंजुरीनंतर सभागृह नेते सुशील सैंदाणे यांनी अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या विकासकामांवर केलेल्या आर्थिक तरतुदीची सविस्तर माहिती दिली. कोणतीही करवाढ न करता शहराच्या विकासाला चालना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचा दावा केला. तसेच, प्रशासनाने सर्व सदस्यांनी केलेल्या सूचनांचा आदर करावा अशी विनंती केली व सहकार्याबद्दल प्रशासन, विरोधक व पत्रकार यांचे आभार मानले.

Web Title: Talegav nagarparishad Budget Tax