औद्योगिक आस्थापनांची काटकसर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

उत्पादन बंद ठेवणे हाच एकमेव पर्याय नव्हे, तर दैनंदिन खर्चात बचतीद्वारे काटकसर तसेच साप्ताहिक सुटीला जोडून मागे व पुढच्या दिवशी सुट्या घोषित केल्या जात आहेत. यातून वाहनखर्च, कॅन्टीन, वीज तसेच इतर खर्च वाचविण्यासाठी धडपड आहे. त्यामुळे साहजिकच पूरक व्यवसाय आणि सेवाक्षेत्रावरही मंदीचा प्रभाव वाढत आहे. पूर्वी कामासाठी कर्मचाऱ्यांना थेट विमानप्रवास देणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापनांनी रेल्वेचा पर्याय निवडला आहे. 

तळेगाव स्टेशन : नोटबंदी, जीएसटी आणि आता प्रदूषण मानके बीएस-6 अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर वाहननिर्मिती आणि सुट्या भागांचा पुरवठा करणाऱ्या औद्योगिक आस्थापनांना सध्या आर्थिक मंदीचा सामना करावा लागतो. त्यातून सावरण्यासाठी आस्थापनांनी वाढीव सुट्यांसह दैनंदिन काटकसरीचा मार्ग अवलंबला आहे. 

ऍटोमोटिव्ह इंडस्ट्रिअल हब म्हणून जगभर ख्याती पावलेल्या तळेगाव-चाकण औद्योगिक पट्ट्यात गतवर्षापर्यंत दसरा-दिवाळीची ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी जूनपासून वाढणारी वाहन उत्पादननिर्मिती यंदा घसरत आहे. पूर्वी जून ते ऑक्‍टोबरदरम्यान आठवडाभर तीन पाळ्यांमधील कामातील तेजी यंदा दिसत नाही. उत्पादन जेमतेम एकाच पाळीत आणि आठवड्यातून चार ते पाच दिवस चालवावे लागत आहे. विक्री घटल्याने बहुतांश औद्योगिक आस्थापनांमध्ये विनाउत्पादन दिवस वाढले आहेत. त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा कापल्या जात आहेत. कंत्राटी कामगार तर केव्हाच दूर सारले. आता कंपनीच्या कामगारांनाही नारळ दिला जात आहे. 

उत्पादन बंद ठेवणे हाच एकमेव पर्याय नव्हे, तर दैनंदिन खर्चात बचतीद्वारे काटकसर तसेच साप्ताहिक सुटीला जोडून मागे व पुढच्या दिवशी सुट्या घोषित केल्या जात आहेत. यातून वाहनखर्च, कॅन्टीन, वीज तसेच इतर खर्च वाचविण्यासाठी धडपड आहे. त्यामुळे साहजिकच पूरक व्यवसाय आणि सेवाक्षेत्रावरही मंदीचा प्रभाव वाढत आहे. पूर्वी कामासाठी कर्मचाऱ्यांना थेट विमानप्रवास देणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापनांनी रेल्वेचा पर्याय निवडला आहे. 

साधारणतः जून 2020 ही बीएस-6 च्या अंमलबजावणीची अंतिम मुदत असल्याने किती वाहन उत्पादन कंपन्या आपल्या वाहनांत बदल करून घेतात, याकडे अवघ्या उद्योगजगताचे लक्ष लागले आहे. बीएस-6 नंतर इलेक्‍ट्रिक वाहन हे दुसरे मोठे आव्हान वाहन उत्पादक कंपन्यांसमोर आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी आणखी वेगळे मार्ग औद्योगिक आस्थापनांना शोधावे लागणार आहेत. 

औद्योगिक आस्थापनांची आकडेवारी 
चाकण औद्योगिक क्षेत्र : 600+ 
खेड, मरकळ औद्योगिक क्षेत्र : 300+ 
तळेगाव औद्योगिक क्षेत्र : 100+ 
(स्रोत फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: talegoan industrial ression