तळजाई अतिक्रमणांच्या विळख्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

पुणे - तळजाई टेकडीवरील वनसंपदा जतन करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या टेकडीवर बांधकामाचा राडारोडा आणून टाकला जात असून काही जागा बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी वापरली जात आहे. तसेच, या ठिकाणी कामगारांसाठी शेडही उभारण्यात आल्या आहेत.

पुणे - तळजाई टेकडीवरील वनसंपदा जतन करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या टेकडीवर बांधकामाचा राडारोडा आणून टाकला जात असून काही जागा बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी वापरली जात आहे. तसेच, या ठिकाणी कामगारांसाठी शेडही उभारण्यात आल्या आहेत.

शहराची फुफ्फुसे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेकडींपैकी तळजाई टेकडी अतिक्रमणांच्या विळख्यात सापडू लागली आहे. या टेकडीवरील काही भाग महापालिकेच्या ताब्यात आहे. उर्वरित भाग वन विभागाच्या ताब्यात आहे. वन विभागाकडील संपूर्ण वनक्षेत्र हे संरक्षित आहे. तर महापालिकेच्या ताब्यात असलेल्या टेकडीवर मानवी हस्तक्षेप वाढला आहे. या टेकडीवर बांधकामाचा राडारोडा टाकला जात आहे. त्यामुळे येथील वृक्षसंपदेला धोका पोचत आहे.

राडारोडा टाकून जागा सपाट केली आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या नैसर्गिक प्रवाहातही यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. 
तळजाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला महापालिकेच्या ठेकेदाराने जागा वापर सुरू ठेवला आहे. या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यासाठी आवश्‍यक बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात दिलेली ही जागा संबंधित ठेकेदार आजही वापरत आहे. या ठिकाणी त्याची यंत्रसामग्री, पाइप, क्रश सॅंड आदी साठविले गेले आहे. याच ठिकाणी कामगारांसाठी शेड उभारण्यात येत असून वासे आणि पत्र्याचा वापर केला जात आहे.

तळजाई टेकडीवरील जागेवर मानवी हस्तक्षेप वाढला आहे. या ठिकाणी महापालिकेने कोणताही नवीन प्रकल्प करू नये. 
- अश्‍विनी कदम, नगरसेविका

संबंधित ठेकेदाराकडून होत असलेल्या जागेच्या वापराविषयी महापालिकेच्या सभागृह नेत्यांना पत्र दिले आहे. ही जागा त्वरित रिक्त करावी. या भागातील अतिक्रमणे दूर करावीत, मोकळ्या जागेवर वृक्षारोपण करावे. 
- महेश वाबळे, नगरसेवक 

Web Title: taljai hill encroachment