‘तळजाई’च्या बैठकीकडे आयुक्तांनी फिरवली पाठ

Saurabah-Rao
Saurabah-Rao

पुणे - तळजाई वन उद्यानातील विकासकामांतर्गत करण्यात येणाऱ्या काँक्रिटीकरणासह इतर प्रकल्पांबाबत मंगळवारी आयोजित बैठकीला महापालिका आयुक्त सौरभ राव गैरहजर राहिल्याने नगरसेवकांनी बैठकीत संताप व्यक्त केला. बैठकीत नगरसेवकांमधील अंतर्गत वाद, प्रशासकीय भूमिकांबाबत वरवरची चर्चा होऊन ती गुंडाळली गेली. त्यामुळे महापौरांच्या आदेशानंतरही तळजाई वन उद्यानातील कामासंदर्भात तोडगा निघाला नाही. 

वनउद्यानात आखलेल्या प्रकल्पांमुळे उद्यानाच्या अस्तिवाला धोका निर्माण होणार आहे, अशी भूमिका घेत या प्रभागातील नगरसेविका आश्‍विनी कदम, साईदिशा माने, नगरसेवक सुभाष जगताप आणि महेश बावळे यांनी प्रकल्पाला विरोध केला आहे. त्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील चर्चेनंतर स्थानिक नगरसेवकांची बैठक घेण्याचा आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी आयुक्त राव यांना दिला होता. त्यानुसार आज बैठक निश्‍चित झाली होती. परंतु आयुक्त न आल्याने अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी ही बैठक घेतली.

आयुक्त बैठकीला येणार नसल्याचे कळताच कदम, माने, जगताप यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, तळजाई टेकडीवरील विकासकामांच्या मुद्द्यावरून नगरसेवक आबा बागूल आणि सुभाष जगताप यांच्यातील राजकीय संघर्ष वैयक्तिक पातळीवर घसरला आहे. त्यामुळे बैठक आटोपती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

झाडे तोडून विकास नको!
कात्रज - तळजाई वन उद्यानात वनराई नष्ट करणारा विकास थांबवा आणि तळजाई वाचवा, असा टाहो पर्यावरणप्रेमींनी फोडला आहे. हा विकास नसून त्यामागे षड्‌यंत्र आहे, असा आरोप नागरिकांनी केला.

तळजाईवर पावसाचे पाणी त्याच ठिकाणी मुरावे, यासाठी सच्छिद्र ब्लॉक असलेले पदपथ उभारले जातील, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, रिजीड ब्लॉकचे पदपथ उभारून फसवणूक केल्याचा आरोप नागरिकांनी केला. निसर्ग आणि समाज या संस्थेने रस्त्याकडेला लावलेली पाचशे झाडे दहा फूट उंचीची होईपर्यंत स्वखर्चाने पाणी घालून जगवली होती. त्यातील काही तोडल्याची तक्रार संस्थेने केली होती. दुसरीकडे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने तीन हजार देशी प्रजातींची रोपे लावून पाच वर्षे संगोपन केले. आता विकासाच्या नावाखाली ही मेहनत वाया जाण्याची भीती नागरिकांनी व्यक्‍त केली.

वन उद्यानाच्या उत्तरेकडे मोकळ्या मैदानाचे रूपांतर क्रिकेटच्या मैदानात केले. त्यानंतर दक्षिणेकडील जागेत पार्किंग शेड आणि त्यावर सोलर पॅनल बसवून सौरऊर्जा निर्मितीचा प्रकल्प होत आहे; परंतु झाडांची कत्तल करून तो उभारल्यास विरोध केला जाईल, असे नागरिकांनी सांगितले. मात्र, झाडं न तोडता तो उभारला जाईल, असे लोकप्रतिनिधी सांगत आहेत. 

दरम्यान, झाडं तोडून होणाऱ्या विकासाला विरोध करणाऱ्या माजी नगरसेवकावर सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल झाला आणि हा वाद चिघळला. अंदाजपत्रकात तरतूद नसताना सौरऊर्जा आणि पार्किंग या प्रकल्पाच्या निविदा कशा निघाल्या, असा आरोपही केला जात आहे. प्रकल्पाचे प्रवर्तक आणि महापालिका प्रशासनाच्या हातघाईला रोखण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे.

आधी सुशोभीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सिमेंटचा वापर झाला आहे. तळजाईचे पर्यावरण नष्ट करणाऱ्या विकासाला आमचा कायम विरोध राहील.
- हणमंत भोसले, नागरिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com