तमाशातील सोंगाड्या झाला फौजदार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

टाकळी : तमाशाच्या राहुटीतच जन्म झाल्याने शिक्षणाचा श्रीगणेशा येथूनच झाला. नृत्य कलाकार म्हणून आईने केलेले कष्ट, शाळेची सुटी झाली की रंगमचावरील हजेरी तर कधी, मनोरंजनासाठी सोंगाड्याची भूमिका करत तमाशा कलावंत पोलिस उपनिरीक्षक बनला आहे. याचे श्रेय त्यांनी आईच्या कष्टांना दिले आहे.

टाकळी : तमाशाच्या राहुटीतच जन्म झाल्याने शिक्षणाचा श्रीगणेशा येथूनच झाला. नृत्य कलाकार म्हणून आईने केलेले कष्ट, शाळेची सुटी झाली की रंगमचावरील हजेरी तर कधी, मनोरंजनासाठी सोंगाड्याची भूमिका करत तमाशा कलावंत पोलिस उपनिरीक्षक बनला आहे. याचे श्रेय त्यांनी आईच्या कष्टांना दिले आहे.

ही कहाणी आहे, सविंदणे (ता. शिरूर) येथील दिनेश मधुकर सकट याची. 
तमाशा कलावंत नंदा सकट या नृत्य कलाकार म्हणून काम करत होत्या. राहुटीत अभ्यास करत त्यांचा मुलगा दिनेश 2009-2010 मध्ये बारावी उत्तीर्ण झाला. या काळात आईला मदत म्हणून तो तमाशात डान्सर, वाद्यकाम, सोंगाड्या अशा भूमिका करू लागला. रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर, दत्ता महाडिक पुणेकर, सर्जेराव जाधव या मोठ्या तमाशांत तो काम करत होता. तमाशात काम करता करता त्याने पाबळ (ता. शिरूर) येथे बी. कॉम.पर्यंतची पदवी मिळवली. पदवीपर्यंतचा त्याचा शिक्षणाचा प्रवास अतिशय खडतर राहिला. त्यात त्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. 2016 मध्ये आई नंदा हिच्या अचानक झालेल्या मृत्यूने या कुटुंबावर मोठे संकट कोसळले. तमाशामध्ये काम न करता मोठा अधिकारी व्हावे ही आईची इच्छा होती. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पुणे येथील काही मित्रांनी यासाठी त्यांना मदत केली. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना इच्छाशक्तीच्या जोरावर तो पोलिस उपनिरीक्षक बनला आहे. 

तमाशा कलावंत म्हटल्यावर जनतेच्या मनोरंजनासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो. त्यातून तमाशा फडांना आलेली उतरती कळा. यामुळे तमाशा कलावंताना त्याचा फटका बसलेला पाहावयास मिळतो. अशा परिस्थितीत त्याने शिक्षणाच्या जोरावर अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. ही तमाशा कलावंतासाठी गौरवाची बाब आहे. 
- रघुवीर खेडकर, अध्यक्ष, तमाशा फड मालक संघटना 

तमाशा कलावंत म्हणून प्रेक्षकांची सेवा करून त्यांचे मनोरंजन केले. जीवनात अनेक बरे-वाईट अनुभव आले. त्यातून मार्ग काढून आईच्या कष्टाचा आशीर्वाद सोबत असल्यानेच तिचे स्वप्न पूर्ण करू शकलो. अधिकारी पदाचा वापरही सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करणार आहे. 
- दिनेश सकट 

Web Title: tamasha actor become policeman