तमाशा कलावंतांची उपेक्षा कायम!! 

मीनाक्षी गुरव
सोमवार, 8 एप्रिल 2019

पुणे : तमाशा कलावंत, कारागीर यांचा शैक्षणिक दर्जा अद्यापही असमाधानकारक आहे. तर, आरोग्य आणि अर्थकारणाबाबत फारसे गांभीर्य नसल्याने त्यांचे जीवन अस्थिर असल्याचे एका संशोधनातून निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात तमाशा तग धरून असला, तरीही तमाशा फडातील कलावंत, कारागीर यांच्या वाट्याला आजही उपेक्षाच आहे. 

पुणे : तमाशा कलावंत, कारागीर यांचा शैक्षणिक दर्जा अद्यापही असमाधानकारक आहे. तर, आरोग्य आणि अर्थकारणाबाबत फारसे गांभीर्य नसल्याने त्यांचे जीवन अस्थिर असल्याचे एका संशोधनातून निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात तमाशा तग धरून असला, तरीही तमाशा फडातील कलावंत, कारागीर यांच्या वाट्याला आजही उपेक्षाच आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र आणि मानव्य विभागांतर्गत "जुन्नर तालुक्‍यातील तमाशा कलावंत आणि कारागीर यांचा सामाजिक व सांस्कृतिक अभ्यास : विस्तार आणि दृष्टिकोन' विषयावर संशोधन करण्यात आले आहे. तमाशा कलावंत आणि कारागीर यांचे जीवनमान, त्यांचा सामाजिक आणि सांस्कृतिक विस्तार, त्यांचे आरोग्य आणि शिक्षण अशा विषयावर संशोधनाद्वारे प्रकाश टाकला आहे. विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील डॉ. सतीश शिरसाठ आणि मानववंशशास्त्र विभागाच्या डॉ. अंजली कुरणे यांनी हे संशोधन केले आहे. या संशोधनासाठी डॉ. उत्तम गोराड हे संशोधक सहायक होते. 

तमाशा कलावंत, कारागीरांना पिण्यासाठी शुद्ध पाणी नसल्यामुळे आणि अवेळी जेवण करावे लागत असल्यामुळे आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. सर्दी, खोकला याबरोबरच त्वचारोग, पोटदुखी, पचन विकार त्यांच्यात अधिक दिसतात. त्यांच्यात शिक्षणाबाबत उदासीनता प्रकर्षाने जाणवते. काही जण आजकाल पदवीपर्यंतचे पारंपरिक शिक्षण घेतात. परंतु, तरीही बेरोजगारीला सामोरे जावे लागते. तमाशा फडात वर्षातील दोन ते चार महिने काम असल्यामुळे उर्वरित काळात पडेल ते काम हे कलावंत करतात. आर्थिक नियोजन फारसे केले जात नसल्याने आर्थिक परिस्थिती अस्थिर असल्याचे दिसते, असे निरीक्षण डॉ. शिरसाठ यांनी नोंदविले आहे. 

संशोधनातील निष्कर्ष : 
- शैक्षणिक दर्जा असमाधानकारक 
- कलावंत आणि कारागिरांमध्ये प्रौढ आणि युवकांचे सर्वाधिक प्रमाण 
- बॅंकेची सुविधा उपलब्ध होत नाही 
- मानधन तुलनेने कमी आणि अनियमित 
- व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण 

 तमाशा कलावंत, कारागिरांचा स्तर उंचाविण्यासाठी हे करता येईल : 
- विद्यापीठामार्फत लोककला शिक्षण विभाग असावा 
- कलावंत, कारागीरांसाठी अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू करणे शक्‍य 
- आरोग्य, सामाजिक आणि शैक्षणिक जागृतीसाठी उपक्रम 
- तमाशा फडासाठी चांगल्या संहितांचे लेखन व्हावे 

तमाशा फड, कलावंत आणि कारागीर : 
महाराष्ट्रात : 
तमाशा फड : अंदाजे 50 हून अधिक 
कलावंत आणि कारागीर : जवळपास दोन हजार 

जुन्नर तालुका : 
तमाशा फड : 27 (अंदाजे) 
कलावंत : सुमारे एक हजार 

असे झाले संशोधन : 
- जुन्नर तालुक्‍यातील 10 तमाशा फडांचा अभ्यास 
- 103 कलावंत, कारागीरांशी बोलणे, निरीक्षण 
- 10 तज्ज्ञांच्या मुलाखती 
- संबंधित विषयावर आधारित साहित्याचा आढावा 

Web Title: Tamasha artists neglected!