ताम्हिणी घाटाच्या कामाला मुहूर्त

Tamhini-Ghat
Tamhini-Ghat

पुणे - चांदणी चौक ते माणगाव (जि. रायगड) हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) हस्तांतरित करण्यात आला आहे. दरम्यान, या रस्त्याच्या कामाला अखेर सुरवात झाली आहे. सुमारे १०३ किमी लांबीचा हा रस्ता सिमेंटचा करण्यात येणार आहे. यामुळे ताम्हिणीघाट मार्गे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

पुणे ते दिघी पोर्ट या रस्त्याला केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे. चांदणी चौक ते माणगाव या १०३ किलोमीटरसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. चांदणी चौक ते पौड-शेंडेपाटील वाडा या दरम्यानचा रस्ता चारपदरी असणार आहे, तर पौड-ताम्हिणी घाट-माणगाव हा रस्ता तीनपदरी असणार आहे. या रस्त्यासाठी सुमारे ५०० कोटींचा खर्च अपेक्षित असून संपूर्ण रस्ता सिमेंट रस्ता करण्यात येणार आहे. 

कोकणामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. याशिवाय माणगाव, दिघी या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. पिरंगुट येथील औद्योगिक वसाहत, विविध शाळा, महाविद्यालये, हिंजवडी येथील आयटी कंपन्यांबरोबर पर्यटनासाठी मुळशी तालुक्‍यात नागरिकांची वर्दळ असते. सध्याचा रस्ता अरुंद असल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी होते. यामुळे ही वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

धोकादायक दरडींना जाळ्या बसविणार
ताम्हिणी घाटात अनेक नागमोडी वळणे असून, या ठिकाणी पावसही अधिक असतो. यामुळे दरड कोसळून घाटात अपघात होऊ नये, यासाठी ‘एमएसआरडीसी’कडून संभाव्य दरड कोसळण्याच्या ठिकाणी जाळ्या बसविल्या जाणार आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे हटविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हस्तांतराची कायदेशीर प्रक्रिया अपूर्ण?
या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडे होते. मार्गावर खड्डे पडल्याने त्याबाबत ओरड सुरू झाल्यानंतर खात्याने हा रस्ता एमएसआरडीसीकडे वर्ग केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कागदोपत्रीच हा रस्ता हस्तांतर झाला आहे. प्रत्यक्षात मात्र कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे समजते. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याकडून माहिती मिळू शकली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com