जोगेश्‍वरीच्या दर्शनाने तनिष्कांनी फुंकले ‘रणशिंग’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 ऑक्टोबर 2016

पुणे - नवरात्राच्या दुसऱ्या माळेला उत्सवी अन्‌ उत्साही वातावरणात पुणे शहरातील तनिष्का सदस्यांनी ग्रामदेवता तांबडी जोगेश्‍वरीच्या चरणी उमेदवारी अर्ज ठेवून ‘तनिष्का निवडणुकी’च्या प्रचाराचा प्रारंभ केला. केशरी साड्या परिधान केलेल्या सुमारे आठशेहून अधिक तनिष्का सदस्यांमुळे हा परिसर केशरी रंगानी फुलून गेला होता.

पुणे - नवरात्राच्या दुसऱ्या माळेला उत्सवी अन्‌ उत्साही वातावरणात पुणे शहरातील तनिष्का सदस्यांनी ग्रामदेवता तांबडी जोगेश्‍वरीच्या चरणी उमेदवारी अर्ज ठेवून ‘तनिष्का निवडणुकी’च्या प्रचाराचा प्रारंभ केला. केशरी साड्या परिधान केलेल्या सुमारे आठशेहून अधिक तनिष्का सदस्यांमुळे हा परिसर केशरी रंगानी फुलून गेला होता.
‘तनिष्का व्यासपीठा’च्या नेतृत्त्व विकास कार्यक्रमांतर्गत १५ आणि १६ ऑक्‍टोबर रोजी पहिल्या टप्प्यातील निवडणुका होत आहेत. उद्या (ता. ३) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे नवरात्राची दुसरी माळ, गांधी जयंती अन्‌ रविवारच्या सुटीचे औचित्य साधत पुणे शहरातील जवळजवळ सर्वच प्रभागांमधून तनिष्का सदस्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तनिष्का सदस्या स्वतः तर आल्याच, सोबत त्यांच्या गटातील सदस्यांनाही मोठ्या संख्येने घेऊन आल्या. कुणी रिक्षाने, कुणी स्वतःच्या चारचाकीने तर उपनगरातील काही तनिष्का सदस्या खासगी बस घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या. तांबडी जोगेश्‍वरी ट्रस्टचे पदाधिकारी आणि पोलिसांच्या सहकार्याने आज सकाळी अकरा ते एक ही वेळ तनिष्का सदस्यांसाठी राखीव ठेवली होती; पण उत्साही तनिष्का सदस्या सकाळी आठपासूनच मंदिराच्या परिसरात जमा होत होत्या. त्यांच्यासोबत तनिष्का व्यासपीठाची महती सांगणारे आणि प्रभागाचे नाव असलेले फलक तनिष्का सदस्या अन्‌ उमेदवारांनी हातात धरले होते. तनिष्का सदस्यांना हा उत्साह पाहून तांबडी जोगेश्‍वरी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे उमेदवारांचे सत्कार करून निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. दर्शन झाल्यानंतर उमेदवारांसह सदस्या आपल्या गटासोबत अप्पा बळवंत चौकातून पदयात्रेद्वारे ‘सकाळ’ कार्यालयाकडे रवाना झाल्या.

उमेदवारांनी आपल्या समर्थक सदस्यांसह उमेदवारी अर्ज सकाळ कार्यालयात दाखल केले. महापालिका अन्‌ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी जसे वातावरण असते, तसेच येथेही वातावरण निर्माण झाले होते. तनिष्काची वैशिष्ट्यपूर्ण निवडणूक कशी होणार, प्रचाराची पद्धत आदी विविध विषयांची माहितीही त्या घेत होत्या. त्यानंतर उमेदवार अन्‌ त्यांच्या समर्थक सदस्यांचे फोटोसेशनही रंगले. प्रत्येकाच्या मोबाईलचा क्‍लिकक्‍लिकाट कार्यालयातून बाहेर जाईपर्यंत सुरू होता. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत भट, तांबडी जोगेश्‍वरी ट्रस्टचे अनिरुद्ध गाडगीळ, प्रसाद कुलकर्णी, राजाभाऊ टिकार यांचे सहकार्य लाभले.

आम्ही तनिष्का, स्मार्ट तनिष्का...
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे उमेदवार मोठ्या संख्येने आल्या होत्या. तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून नेतृत्त्व विकास करण्याची संधी उपलब्ध होत असल्याने तनिष्का सदस्यांमध्ये आनंदी वातावरण आहे. ‘मी तनिष्का, आम्ही तनिष्का, स्मार्ट तनिष्का...’ अशा घोषणाही याप्रसंगी सदस्या देत होत्या.  

रुबाबदार फेटे अन्‌ उपरणी 
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हडपसर, बिबवेवाडी अन्‌ मुंढव्याच्या तनिष्का सदस्या केशरी रंगाचे रुबाबदार फेटे अन्‌ ‘तनिष्का’ लिहिलेले उपरणी परिधान करून आल्या होत्या. असा पेहराव केल्याने गर्दीतही त्यांचे वेगळेपण उठून दिसत होते.

तुम्हीही व्हा सहभागी !
तनिष्का व्यासपीठाच्या सदस्यांसह शहरातील इतर महिलाही या नेतृत्त्व विकास कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. तनिष्का कॉल सेंटरला सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ९२२५८००८०० या क्रमांकावर फोन केल्यास यासंबंधी अधिक माहिती मिळू शकेल.

Web Title: tanishka election in pune

टॅग्स