‘तनिष्कां’नी अनुभवला थरार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

पुणे - हळूहळू लिफ्ट खाली उतरत होती, तशी मनातली धाकधूकही वाढलेली... अखेर ती थांबताच गारठ्यामुळे अंगावर आलेला शहारा, समोरील भितींच्या पलीकडे असलेला अब्जावधी लिटर पाण्याचा दबाव अन त्यातून वेगाने रिचणारे पाणी... सोबतीला निस्तब्ध शांतता अन आश्‍चर्यचकित झालेले चाळीसहून अधिक चेहरे..! 

पुणे - हळूहळू लिफ्ट खाली उतरत होती, तशी मनातली धाकधूकही वाढलेली... अखेर ती थांबताच गारठ्यामुळे अंगावर आलेला शहारा, समोरील भितींच्या पलीकडे असलेला अब्जावधी लिटर पाण्याचा दबाव अन त्यातून वेगाने रिचणारे पाणी... सोबतीला निस्तब्ध शांतता अन आश्‍चर्यचकित झालेले चाळीसहून अधिक चेहरे..! 

‘तनिष्का व्यासपीठा’च्या वतीने सदस्यांसाठी कोयना प्रकल्प अभ्यास दौऱ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या वेळी सदस्यांनी थरारक अनुभव घेतलाच, पण या प्रकल्पाच्या माध्यमातून बहुतांश प्रमाणात वीज निर्माण करून राज्यभरात ती कशाप्रकारे पोचवली जाते, याचा अभ्यासही केला. धरणाची भिंत, वीजप्रकल्प यांसह तेथील उद्यानालाही त्यांनी भेट दिली. धरणाच्या इतिहासासह बांधकामावेळी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान, वेळोवेळी त्यात करण्यात आलेले आधुनिक बदल त्यांनी जाणून घेतले. धरणातून पाणी सोडल्यानंतर टर्बाईन फिरण्याची यंत्रणा, पाण्यामुळे भिंतीवर येणारा दबाव मोजणारे यंत्र, भूकंपमापक यंत्रणा काम कशाप्रकारे करते, हे त्यांनी समजावून घेतले. घरात एक बटण दाबल्यावर येणारी वीज कशाप्रकारे निर्माण होते, त्यासाठीचे नियोजन पाहून तनिष्का सदस्या भारावून गेल्या. या दौऱ्यासाठी सहायक अधीक्षक अभियंता अभय काटकर यांचे सहकार्य लाभले. आरेखक आर. आर. बिराजदार यांनी कोयना धरणाची माहिती तनिष्कांना दिली व त्यांच्या शंकांचे निरसनही केले. या दौऱ्यामध्ये पुणे शहर, बारामती आणि सातारा येथील तनिष्का सदस्या सहभागी झाल्या होत्या.

तनिष्का सदस्या सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात. या प्रकल्पाला भेट आणि येथील कार्यपद्धती जाणून घेतल्यामुळे त्यांच्या माहितीत भर पडेल. या प्रकल्पामध्ये सर्वच स्तरावर अचूक नियोजन केले जाते. सदस्यांनीही त्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात  नियोजन केल्यास त्याचा त्यांना फायदा होईल. 
- वैशाली नारकर, अधीक्षक अभियंता, कोयना प्रकल्प

Web Title: Tanishka Member Koyana Project Tour