थंडीतही तनिष्कांना मिळाला उस्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

"सकाळ माध्यम समूहा'ने तनिष्काच्या माध्यमातून स्त्रियांना प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. विविध सामाजिक उपक्रमांत तनिष्का सदस्या उत्साहाने सहभागी होत आहेत. तनिष्काच्या मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन मला आनंद झाला.
- प्रा. सुशीला आबुटे, महापौर, सोलापूर

मतांसाठी लाखो मिस्ड कॉल, मुस्लिम तरुणींची संख्या लक्षणीय
पुणे - थंडीचा कडाका जाणवत असताना रंगबेरंगी स्वेटर, शाली पांघरून महिला मोठ्या संख्येने जमल्या, त्या तनिष्का उमेदवारांना मतदान करण्यासाठी... राज्यात नाशिक, सोलापूर, यवतमाळ, भंडारा येथे 23 केंद्रांवर आज सकाळपासून हेच चित्र दिसत होते. तनिष्का व्यासपीठाच्या निवडणुकीत सुमारे पंधरा हजार महिलांनी प्रत्यक्ष मतदानात भाग घेतला आणि लाखो मिस्ड कॉलच्या माध्यमातून तनिष्कांना पाठबळ दिले.

यवतमाळ, भंडारा जिल्ह्यांत सकाळी आठ वाजल्यापासून वातावरण जणू तनिष्कामय झाले होते. भंडारा, तुमसर, साकोली, पवनी, लाखांदूर, बारव्हा येथे महिलांनी रांगा लावून तनिष्कांना सामाजिक कामात आम्हीही तुमच्याबरोबर आहोत, याचीच ग्वाही दिली. नाशिक जिल्ह्यात मालेगाव शहराच्या पूर्व भागात मुस्लिम तरुणी, महिलांची गर्दी जाणवण्याजोगी होती. असेच चित्र सोलापूरमध्ये मोहोळ तालुक्‍यात होते. 18 वर्षे पूर्ण झालेल्या अनेक विद्यार्थिनींनी "तनिष्का'च्या निवडणुकीत प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. त्यातही मुस्लिम विद्यार्थिनींची संख्या जास्त होती. मालेगावच्या ग्रामीण भागात मतदान करून महिला शेतीकामासाठी गेल्या. गोधड्या परदेशात पाठवणाऱ्या झोडगे येथील तनिष्का गटाने या निवडणुकीमागचा सामाजिक आशय परिसरात वेळोवेळी सांगितला होता. त्यामुळे वाडी, वस्तीवरील महिला मतदार बैलगाडीतून मतदानासाठी येत असल्याचे दृश्‍य पाहायला मिळाले.

जुळे सोलापुरातील समर्थ नगरातील केंद्रावर महापौर प्रा. सुशीला आबुटे यांनी मतदान केले. नगरसेविका फिरदोस पटेल, रजनी काळे यांच्यासह शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. बंदोबस्तासाठी आलेल्या महिला पोलिसांनीही मिस्ड कॉल देऊन नेतृत्व विकास कार्यक्रमाच्या मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला. बोरामणी, मोहोळ, बार्शी, माढा, करमाळा येथे वृद्ध महिलांपासून तरुणींनी मतदान केले. बार्शी-कळंबवाडीत झालेल्या गर्दीत स्वतःचा प्रचार करण्याची संधी बार्शी नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दिलेल्या मीना पवार यांनी घेतली. त्यांनी मतदानही केले.

करमाळ्यात अत्यंत अटीतटीने मतदान झाले. ज्ञानेश्‍वर वाचनालयातील मतदान केंद्रापुढे वाहनांची मोठी रांग लागली होती. शिवाय सार्वजनिक वाहनांतून शहराच्या विविध भागांतून आलेल्या महिलांनी मतदान केले. माढ्यात चुरस मोठी होती. मोठ्या रांगा लागल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.

राज्यभर तनिष्का सदस्यांसह प्राध्यापिका, डॉक्‍टर, शिक्षिका, नोकरदार, गृहिणींनी मतदान केले. विविध पक्षांच्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन निवडणूक प्रक्रिया समजून घेतली. तनिष्का उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

राज्यभरात अमरावती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, नाशिक येथील 77 केंद्रांवर उद्या मतदान होणार आहे. ग्रामीण भागातील मतदान केंद्रांची संख्या त्यात जास्त आहे. तनिष्का उमेदवार सर्वदूर पोचल्याचे चित्र मतदानातून पुढे येत आहे.

Web Title: Tanishka Second Phase Election from today