तनिष्कांनी उभारली सुरक्षेची, स्वच्छतेची गुढी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

महिलांवरील अत्याचाराविरोधात राबवणार विविध उपक्रम

महिलांवरील अत्याचाराविरोधात राबवणार विविध उपक्रम
पुणे - तनिष्का व्यासपीठाच्या चौथ्या वर्धापनदिनी राज्यभरातील तनिष्कांनी महिला सुरक्षेची, पर्यावरणाची, शहर-गाव स्वच्छतेची गुढी उभारली. चैतन्याने भारलेल्या वातावरणात तनिष्कांनी जणू आगामी वर्षाचा संकल्पच जाहीर केला. या सगळ्याची सुरवात कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात झाली. तिथे तनिष्कांनी "लेक वाचवा - लेक शिकवा' या चळवळीत सहभागी होताना वर्षभर महिलांवरील अत्याचाराविरोधात विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार केला.

तनिष्का व्यासपीठाची सुरवातच कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिरात स्त्री प्रतिष्ठेची गुढी उभारून झाली. यंदाही तीच परंपरा जपत तनिष्कांनी राज्यभर विविध ठिकाणी गुढ्या उभारल्या. दरवर्षी गुढी उभारताना तनिष्का सामाजिक कामाचा संकल्प सोडतात. यंदा त्यात भरच पडली आहे. म्हैसाळ, कोपर्डीसारख्या घटना पुन्हा पुन्हा घडू नये म्हणून वेगवेगळे कल्पक उपक्रम राबवण्याचे ठरले. पुसद, वणीपासून म्हसवड, सोयगाव, पुणे, नाशिक, जळगाव, नव्या मुंबईतील हजारो तनिष्का सदस्यांनी गुढ्या उभारल्या. कवठे महाकाळ, कोडोली, जोतिबा येथेही तनिष्कांनी मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवत गुढी उभारली.

नगर जिल्ह्यात कर्जत येथे पाणीबचतीची शपथ घेण्यात आली. संगमनेर येथे "पर्यावरण बचाव'चा संकल्प करण्यात आला. कळसकर विद्यालयातील परिसराची स्वच्छता करून, सडा घालून रांगोळ्या काढून प्रसन्न वातावरणात गुढी उभारली.

दामिनींना आमंत्रण
जुळे सोलापुरात तनिष्कांनी सुरक्षेचा संकल्प सोडत शहर पोलिस दलाच्या दामिनी पथकातील बीट मार्शल अंजली दहिहंडे व सहाय्यक फौजदार अहिल्या काळे यांच्या हस्ते गुढी उभारली. त्यांनी स्वसंरक्षणाबाबतचे मार्गदर्शन केले.

महिलांवरील अन्याय दूर करा, अशी मागणी करीत सातारा जिल्ह्यात सुरक्षिततेची गुढी उभारली. स्त्री भ्रूणहत्येबाबत जागृतीचा निर्धार, मुलीच्या जन्माचे स्वागत, छेडछाडीबाबत पोलिसांना निवेदन, तक्रार पेट्या बसविण्याचा निर्णय असे विविध उपक्रम राबवले. साताऱ्यातील दौलतनगरच्या तनिष्कांनी महिलांच्या सुरक्षेची शपथ घेऊन गुढी उभारली. दहिवडी येथे पोलिस अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. वाई, गुळुंब, केंजळ, ओझर्डे येथील स्त्री भ्रूणहत्या रोखण्याचा निर्धार करत मुलींच्या जन्माचे स्वागत केले. डेळेवाडी (ता. कऱ्हाड) येथील तनिष्कांनी गावात तक्रार पेटी बसवली. महिला सुरक्षा समिती व निर्भया पथकात तनिष्कांना सहभागी करणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी म्हसवडच्या तनिष्कांना सांगितले.
नाशिक येथे तनिष्कांनी वाहन चालवताना हेल्मेट न वापरणाऱ्यांना गुलाबाचे फूल देऊन सुरक्षिततेचा संदेश दिला. जळगाव शहरासह विविध ठिकाणी स्त्री प्रतिष्ठेची गुढी उभारण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात सोयगाव, जरंडीसह बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद येथेही पाणी, पर्यावरण वाचवण्यासाठी उपक्रम राबवण्याचे ठरले.

स्वच्छ महाराष्ट्राच्या मोहिमेत तनिष्का सक्रिय आहेत. पुसद, वणी, म्हसवड येथे वैयक्तिक स्वच्छतागृहासह सामाजिक आरोग्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी जागृती करण्यात येईल. उपक्रम हाती घेतले आहेत.
- हर्षदा मेवेकरी, कोल्हापूर

बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील तनिष्कांनी सुरू केलेल्या राज्यातील पहिल्या महिला शेतकरी कंपनीत आर्थिक प्रगतीची, सुरक्षेची गुढी उभारण्यात आली.

Web Title: tanishka security & cleaning gudhi