"तनिष्कां'चे आजपासून अधिवेशन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

मुंबईत 650 सदस्या दाखल; विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन

मुंबईत 650 सदस्या दाखल; विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन
पुणे - तनिष्का सदस्यांचे दोन दिवसांचे राज्यव्यापी अधिवेशन राजधानी मुंबईत उद्यापासून (ता. 19) सुरू होत आहे. गोंदिया, गडचिरोलीपासून पालघर, मोखाडा, दापोलीसह राज्याच्या सर्व भागातून सुमारे 650 तनिष्का सदस्या अधिवेशनासाठी मुंबईत दाखल झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या अधिवेशनाची गुरुवारी (ता. 20) सांगता होईल.

तनिष्का व्यासपीठाअंतर्गत तीन महिन्यांपूर्वी मोठ्या उत्साहात व चुरशीच्या वातावरणात निवडणूक झाली. त्यात दीड हजार तनिष्का सदस्यांनी सहभाग घेतला. प्रत्यक्ष मते व मिसकॉलची मते मिळवून 25 लाख मते मिळविण्यात तनिष्का सदस्या यशस्वी झाल्या. निवडणुकीत सहभागी झालेल्या तनिष्कांसाठी आता पुढचा टप्पा म्हणून अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. नेतृत्व, क्षमता आणि उद्योजकता विकास या त्रिसूत्रीवर अधिवेशनाचे स्वरूप निश्‍चित करण्यात आले आहे.

राज्य सरकारमधील विविध खात्यांचे उच्चपदस्थ अधिकारी, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ-उद्योजक तनिष्कांना मार्गदर्शन करणार आहेत.
तनिष्का व्यासपीठाच्या गेल्या चार वर्षांच्या प्रवासात घडलेल्या यशोगाथा, पर्यावरण संवर्धन, दुष्काळनिवारण यासंबंधीचे स्वानुभव काही तनिष्का या वेळी मांडणार आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बुधवारी (ता. 19 ) सकाळी 11 वाजता अधिवेशाचे उद्‌घाटन होईल.

"एलिफन्ट डिझाईन'च्या सहसंस्थापिका प्रसिद्ध डिझायनर तज्ज्ञ आश्विनी देशपांडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्‌घाटन होईल. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, प्रधान सचिव दीपक कपूर, नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर तसेच "टायकॉन'चे जागतिक विश्वस्त विश्वास महाजन, कॉर्पोरेट ट्रेनर रवी कोवाडकर, प्रायमूहचे संचालक राजेंद्र होलानी, उद्योजिका रेवती रॉय, अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रज्ञा सरवदे अधिवेशनात मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय केलॉग्ज इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालिका संगीता पेंढुरकर तनिष्कांशी संवाद साधणार आहेत. अधिवेशनासाठी राज्याच्या सर्व जिल्ह्यांमधून रेल्वे, बस आणि खासगी वाहनांमधून तनिष्का उमेदवार मोठ्या उत्साहाने मुंबईकडे आल्या आहेत.

Web Title: tanishka session today