मुलांसाठी घ्यायचे होते घर पण...

संदीप घिसे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

पिंपरी - मुलांच्या शाळेजवळ आणि आपल्या ऑफिसजवळ स्वप्नातील नवीन घर पाहण्यात आई-वडील दंग होते. मात्र, त्याचवेळी त्यांचा मुलगा त्या सोसायटीमधील स्वीमिंग पुलामध्ये पडला. जेव्हा पालकांच्या लक्षात ही गोष्ट आली तोपर्यंत फार उशीर झाला होता. घरातील सर्वांचा लाडका या जगाचा निरोप घेऊन गेला होता.

पिंपरी - मुलांच्या शाळेजवळ आणि आपल्या ऑफिसजवळ स्वप्नातील नवीन घर पाहण्यात आई-वडील दंग होते. मात्र, त्याचवेळी त्यांचा मुलगा त्या सोसायटीमधील स्वीमिंग पुलामध्ये पडला. जेव्हा पालकांच्या लक्षात ही गोष्ट आली तोपर्यंत फार उशीर झाला होता. घरातील सर्वांचा लाडका या जगाचा निरोप घेऊन गेला होता.

तनिष्क अर्जुन कोल्हे (वय ८, रा. रेणुका अपार्टमेंट, समर्थ कॉलनी, दळवीनगर, चिंचवड) असे मृत बालकाचे नाव आहे. तनिष्क विद्यानिकेतन शाळेत तिसरीत शिकत होता. त्याचे वडील टाटा कंपनीमध्ये कामाला आहेत. मुलांची शाळा आणि वडिलांच्या ऑफिसपासून जवळ असलेल्या ठिकाणी घर घेण्यासाठी कोल्हे कुटुंबीयांची शोधमोहीम सुरू होती. 

१५ ऑगस्टला तनिष्कच्या शाळेला आणि वडिलांना सुटी असल्याने ते नवीन घर शोधण्यासाठी दुपारी घराबाहेर पडले. त्यांचा मोठा मुलगा क्रिकेटच्या ट्रेनिंगसाठी गेल्याने त्यांनी लहान मुलगा तनिष्कला सोबत घेतले.

बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील साई फॉर्च्युन येथे ते घर पाहण्यासाठी गेले. नवीन सोसायटीत स्वीमिंग पूल असल्याचे पाहून तनिष्क हरखून गेला होता. ‘तुम्ही घर पाहून या, तोपर्यंत येथे पोहणाऱ्यांना मी पाहतो,’ असे तनिष्कने वडिलांना सांगितले. आईला पाठीचे दुखणे असल्याने त्या खालीच थांबल्या. तेवढ्यात नातेवाइकांचा फोन आल्याने त्या फोनवर बोलत होत्या. नवीन सोसायटीत लहान मुलांसाठी व मोठ्यांसाठी वेगवेगळे स्वीमिंग पूल आहेत. दोन्ही पुलांच्या भिंतीवरून तनिष्क चालत असताना त्याचा तोल गेल्याने तो मोठ्यांसाठी असलेल्या स्वीमिंग पुलामध्ये पडला. वडील घर पाहून दुपारी दोनच्या सुमारास खाली आले, असता त्यांना तनिष्क दिसला नाही, त्यामुळे त्याच्या आईला विचारले. सर्वांनी शोधाशोध केली. मात्र, तो सापडला नाही. स्वीमिंग पुलमध्ये पाहिले असता, तळाशी तो असल्याचे दिसून आले. तनिष्कला त्वरित बाहेर काढले आणि थेट थेरगाव येथील खासगी रुग्णालय गाठले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. 

तनिष्क अत्यंत चपळ होता. नुकतीच त्याने कराटेची स्पर्धा जिंकून राज्यस्तरीय खेळासाठी निवड झाली होती. बुधवारी शाळेत ध्वजवंदन करून आल्यावर त्याने कॉलनीतील कार्यक्रमालाही हजेरी लावली.

मुलाचे ऐकले असते तर...
तनिष्कला घरी टीव्ही पाहायचा असल्याने तो आई-वडिलांसोबत जाण्यास तयार नव्हता. मात्र, लहान मुलाला एकटे कसे सोडायचे म्हणून त्याला सोबत नेले. मुलाचे ऐकले असते तर... असे म्हणत त्यांच्या आईने हंबरडा फोडला.

Web Title: Tanishq Kolhe Death in Swimming Tank Drown